कोल्हापूर : ज्येष्ठ लेखिका, कवयित्री, नामवंत शिक्षिका तज्ञ समुपदेशक व समाजसेविका प्रा. अनुराधा कृष्णराव गुरव (वय ७९) यांचे शनिवारी दुपारी वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या इच्छेनुसार त्यांचे देहदान करण्यात आले. त्यांच्या निधनाने कोल्हापुरातील साहित्य क्षेत्रात पोकळी निर्माण झाली आहे. त्यांच्या मागे मुलगा डॉ. आशिष, मुलगी डॉ. तृप्ती, बहीण साहित्यीका डॉ. लीला पाटील, सून, नातवंडे असा मोठा परिवार आहे. अनुराधा गुरव या मुळच्या सोलापुरातील बाळे गावच्या. वडिल वतनदार रंगनाथ पाटील हे पुरोगामी विचारांचे. त्यामुळे त्यांनी पाचही मुलींना शिक्षणासाठी प्रोत्साहन दिले. पुढे १९६५ साली मौनी विद्यापीठात गणित आणि विज्ञान विषयांची शिक्षिका म्हणून रुजू झाल्या.
कथासंग्रह, कादंबरी, कवितासंग्रह, बालसाहित्य,समीक्षण, नवसाक्षर , शैक्षणिक, लेख अशा सर्व लेखन प्रकारात त्यांनी मुशाफिरी केली.माध्यमीक शाळा, बीएड महाविद्यालये, पॉलिटेक्निकमध्ये अध्यापनासोबतच प्राचार्य, संचालक, विभाग प्रमुख अशा विविधपदांवर त्यांनी काम केले. पुढे त्यांनी शिवाजी विद्यापीठाच्या प्रौढ शिक्षण विभागात काम केले. त्यानंतर डॉ. डी. वाय. पाटील डी. एड. महाविद्यालयाच्या प्राचार्या म्हणून सेवा बजावली. यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या विभागीय संचालक म्हणूनही त्यांनी काम केले होते.
विधिसेवा प्राधिकरण, बाल न्याय मंडळ, कौटूंबिक प्रश्न निर्मूलन, लोकन्यायालय, जिल्हा बालन्यायालय अशा विविध समित्या केंद्र व राज्य शासनाच्या योजना, विद्यापीठाच्या तालुका, जिल्हा न्यायालयांच्या कायदा सल्ला समितीमध्ये २५ वर्षे काम करताना त्यांनी नागरिकांचे प्रश्न हाताळले. आपुलकी या संस्थेच्या माध्यमातून त्यांनी समाजकार्य सुरु ठेवले.
दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभा, श्री. द. पानवलकर, साहित्य रत्न, वुमेन्स फौंडेशनचा साहित्य भूषण अशा विविध पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आले आहे. अनेक साहित्य संमेलनांचे अध्यक्षस्थान त्यांनी भूषविले. त्यांचे ३० कथासंग्रह, १३ कादंबर्या, एकांकिका संग्रह, बालसाहित्याची ३० पुस्तके, नवसाक्षर साहित्याची ४३ पुस्तके, शैक्षणिक १२ पुस्तके, लेखसंग्रह १६ पुस्तके असे विपुल साहित्य प्रकाशित झाले आहे.