संदीप आडनाईककोल्हापूर : ‘बाहुबली’चे दिग्दर्शक एस. एस. राजामौली यांचा ब्लॉकबस्टर ‘आरआरआर’ चित्रपट देश-परदेशात बॉक्स ऑफिसवर विक्रमी कमाई करत आहे. या बिग बजेट सिनेमातील दोन गाण्यांचे व्हीएफएक्सचे एडिटिंग कोल्हापुरात केले असून, यातील ‘जननी’ गाण्यातील शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचा वापर यात खास कोल्हापुरी टच आकर्षण बनले आहे. येथील तीन कलाकारांनी त्यांच्या स्टुडिओत या गाण्यांना स्पेशल इफेक्ट्स दिले आहेत.राम चरण, ज्युनिअर एनटीआर, अजय देवगण, आलिया भट आणि श्रीया सरन यांच्यावर चित्रित केलेल्या सिनेमातील ‘नाचो नाचो’ आणि ‘जननी’ या गाण्यांनी सोशल मीडियावर चांगलाच धुमाकूळ घातला आहे. या सिनेमातील या दोन गाण्यांसाठी कोल्हापुरातील रुईकर कॉलनी येथील ‘कीफ्रेम स्टुडिओ’चे शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी व्हीएफएक्सचे काम पाहिले.
या गाण्यांमधील अनेक चित्तथरारक प्रसंगात वास्तवतेच्या पलीकडे जात कॉम्प्युटर ग्राफिक्सच्या मदतीने रोमांचकारी स्पेशल इफेक्ट देण्यात आले आहेत. या गाण्यांवर १५ जणांच्या टीमसह ५० विद्यार्थ्यांनी दोन महिने काम केले आहे. या काळात ९०हून अधिक दृश्यांचे संकलन त्यांना करावे लागले.
मूळचा राधानगरी तालुक्यातील राशिवडे येथील मधुर अजित चांदणे आणि कोल्हापूरचा वसीम मुल्लाणी हे चौदा वर्षांपासून व्हीएफएक्स क्षेत्रात काम करत आहेत. त्यामुळे त्यांनी सहा वर्षांपूर्वी रुईकर कॉलनी येथे ‘कीफ्रेम स्टुडिओ’ ही इन्स्टिट्यूट सुरू केली. येथे अभ्यासक्रम शिकविण्याबरोबरच निर्मिती करण्यात येते. जवळपास दीडशेहून अधिक विद्यार्थी येथून शिकून बाहेर पडले आहेत.
या चित्रपटांचेही व्हीएफएक्स येथेच झाले
प्रदीर्घ अनुभव असल्यामुळे त्यांना यशराज फिल्मस, प्राईम फोकस, रेड चिलीज, एनवाय व्हीएफएक्सवाला यासारख्या मोठ्या कंपन्यांकडून काम मिळते. यापूर्वी या टीमने ‘टोटल धमाल, बाहुबली २, ८३, सिम्बा, घायल वन्स अगेन, व्हाय आय किल्ड गांधी’ या हिंदी तसेच ‘माऊली, हिरकणी’सारख्या मराठी चित्रपटांबरोबरच ‘रंगबाज, ब्रिद, प्रोजेक्ट ९१९१, गुरू, प्यारवाली लव्ह स्टोरी’, नेटफ्लिक्सवरील ‘द कपिल शर्मा शो’ यासारख्या संपूर्ण वेबसिरीज तसेच आयपीएलच्या यापूर्वीच्या दोन्ही सिझनच्या जाहिरातींचे एडिटिंग केले आहे. सध्या ‘ब्रम्हास्त्र’चे काम सुरू आहे तसेच एका अतिभव्य हॉलिवूडपटाचे कामही लवकरच सुरू होणार आहे.