मानवी जीवनामध्ये कलेला अनन्यसाधारण महत्त्व आहे. त्याची ओळख ही त्याच्या नावावरून नाही तर नक्कीच त्याच्या कलेवरून केली जाते. कलेची ही अविरत साखळी त्याच्या ‘हृदय-बुद्धी’ मध्ये बांधलेली असते. त्याचे दैनंदिन वर्तन, त्याचे हावभाव, त्याची ढंग, ही या कलेच्या माध्यमातून बाहेर पडत असते. मानवी जीवन हे जिवंतपणाचे भव्य कलेचा आरसा आहे. अनेक रमणीय ताल, सूर, सप्ताष्टक आणि खुद्द ६४ कलेची सुंदर विद्या ही त्याच्यामध्ये जन्मापासून मरेपर्यंत विराजमान असते. खरे तर जगण्याच्या कलेपासून सुरू झालेल्या त्याच्या प्रवासात जेव्हा त्याची अंतरंगातील कलेशी भेट होते, त्यावेळी त्याच्या हातून निर्माण होणारी कलाकृती ही त्याला कलाकार बनविण्यासाठी उद्युक्त करते. या निर्मळ कलेची स्पंदने मानवाला स्वच्छ कलाकार बनवण्यासाठी मदत करतात.
कला ही मानवाला जगायला शिकवते, हसायला शिकवते आणि वेळीच रडायला शिकवते. अर्थात माणूस म्हणून जगायचे कसे हा पाठ आयुष्याच्या कार्यशाळेत कलाच शिकवते. कधी आपली आई बनून, आपल्या डोक्यावर प्रेमाचा हात फिरवते, कधी आपले वडील बनून आयुष्याच्या वाटेवर उभे राहायला शिकवते. तर कधी अनुभवांचा सच्चा गुरू बनून आपल्या पाठीशी खंबीरपणे उभी राहते.
कला ही जन्मत:च आपल्या अंगी असते. या वातावरणात पडणाऱ्या पहिल्या पावलानिशी ती प्रत्येक श्वासातून आपल्या रोमारोमात साचत जाते. माणूस जसा मोठा होतो, तशी त्याच्या अंगातील कला देखील मोठी होत जाते आणि त्याच्या वृद्धपणात जमलेच तर त्याच्या काठीचा आधार बनून जाते. पण काही वेळा उपजत मिळणाऱ्या या कलेकडे आपण दुर्लक्ष करतो. स्वत:मधील कला इतरांमध्ये शोधतो.
कलेला अंत नाही वा वय नाही. चंद्र-सूर्याप्रमाणे ती सुद्धा अबाधित आहे. या कलेला ओळखूनच एक सच्चा माणूस बनून हा या कलेचा सन्मान असेल. खरंतर मानवाच्या या जगण्याच्या स्पर्धेत माणूस होणे याला सध्या खूपच स्कोप आहे.
स्वत:मध्ये नक्कीच एकतरी कलेचा गरूड स्वैर संचार करू द्या, जेव्हा या गरुडाची सूर किंकाळी आभाळ चिरून ईश्वरी हृदयाला भिडेल त्यावेळी या कलेच्या स्पंदनाची तेजस्वी ऊर्जा समस्त ब्रह्मांडाला जाणवेल, ही ताकद विचारात असते. मेंदुत असते.
कला वाढवू या, जपू या, एक माणूस बनू या
हे या स्पंदनांपायी सांगणे.
0000