कोल्हापूर : करवीरनिवासिनी अंबाबाईच्या मूर्तीला केमिकल कॉन्झर्वेशन करण्यात यावे, असा तज्ज्ञांचा अहवाल आहे. मात्र, शिल्पकार अशोक सुतार यांनी मूर्तीस वज्रकवच केल्यास मूर्तीला पूर्ववत सौंदर्य प्राप्त होईल, असा दावा केला आहे. शुक्रवारी वज्रलेप विषयावर होणाऱ्या सुनावणी दरम्यान मूर्तीला वज्रलेप की वज्रकवच हा मुद्दा उपस्थित होणार आहे. त्यावर पुरातत्व खाते जी प्रक्रिया सुचवेल त्यानुसार मूर्तीचे संवर्धन केले जाईल, यावर वज्रलेप समिती, श्रीपूजक, देवस्थान समिती यांचे एकमत झाले आहे. मीडिएशन सेंटर काय निर्णय देईल याकडे आता लक्ष लागले आहे. करवीरनिवासिनी अंबाबाईच्या मूर्तीला वज्रलेप करावा की करू नये, या विषयाचा वाद सध्या वैकल्पिक वाद निवारण केंद्रात सुरू आहे. शासनाने नियुक्त केलेल्या वज्रलेप समितीला अध्यक्ष नसल्याचे तांत्रिक कारण सांगून देवस्थानने आणि समितीच्या वकिलांनी त्यातून अंग काढण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, काही दिवसांपूर्वी झालेल्या बैठकीत आमदार चंद्रकांतदादा पाटील यांनी वज्रलेप समितीला अध्यक्ष देण्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार अध्यक्ष निवडीच्या हालचालीही सुरू झाल्या आहेत. याच बैठकीत शिल्पकार अशोत सुतार यांनी स्वत: मेणापासून बनवलेली अंबाबाईची मूर्ती नेऊन मूर्तीचे सौंदर्य अधोरेखित केले. केमिकल कॉन्झर्वेशन या प्रक्रियेमुळे अंबाबाई मूर्तीचे आहे ते स्वरूप राहील पण वज्रकवच केल्याने पुराणात उल्लेख असल्याप्रमाणे देवीची मूर्ती पूर्ववत होईल, असा सुतार यांचा दावा आहे. इतकी वर्षे देवीच्या मूर्तीला वज्रलेप करावा की नको या विषयावरून वाद सुरू होता आता वज्रकवच या पर्यायामुळे आणखी एकदा पेच निर्माण झाला आहे.आता पुन्हा न्यायालयीन प्र्रक्रिया नको...मूर्तीच्या वज्रलेपावरून गेली १२ वर्षे न्यायालयीन लढाई सुरू होती. आता हा विषय शेवटच्या टप्प्यात आहे. सर्वानुमते पुरातत्व खात्याने सुचवलेल्या केमिकल कॉन्झर्वेशन या पर्यायावर शिक्कामोर्तब होईल आणि संबंधित विभागांकडून काम सुरू होईल. त्यामुळे आता हा विषय सुटण्याच्या मार्गावर असल्याने पुन्हा त्यात वाद-विवाद किंवा न्यायालयीन प्रक्रिया सुरू होऊन विषय पुन्हा रखडू नये, असे मत या विषयाशी निगडित व्यक्तींनी व्यक्त केले.वज्रलेप किंवा वज्रकवच या दोन्ही प्रक्रिया म्हणजे देवीच्या मूळ मूर्तीवर दगडासारख्या कठीण धातूचा जाड थर देणे आणि अतिरिक्त भार टाकणे जे मूर्ती पेलू शकत नाही. हे वज्रकवच निघाले की मूर्तीचे प्रत्येक पार्ट घेऊन बाहेर पडेल. त्यामुळे आर्कालॉजिकल विभागाने सुचवलेल्या केमिकल कॉन्झर्वेशनला पर्याय नाही. त्यांच्या सूचनांपलीकडे कोणीच जाऊ शकत नाही. - गजानन मुनिश्वर, श्रीपूजक
अंबाबाई मूर्तीला केमिकल कॉन्झर्वेशन की वज्रकवच
By admin | Published: January 29, 2015 12:24 AM