कोल्हापूर : उच्चशिक्षणाच्या धोरणांवर चर्चा करण्यासाठी शिवाजी विद्यापीठात महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान आणि गोवा राज्यातील कुलगुरूंची परिषद २६ आणि २७ नोव्हेंबरला आयोजित केली आहे. असोसिएशन आॅफ इंडियन युनिव्हर्सिटीतर्फे दरवर्षी विभागनिहाय कुलगुरू परिषद आयोजित केली जाते. यंदा शिवाजी विद्यापीठाला परिषदेचे यजमानपद मिळाले आहे. विद्यापीठाने असोसिएशनला मेक इन इंडिया आॅफ हायर एज्युकेशन, न्यू हायर एज्युकेशन आणि डिजिटल इंडिया इन हायर एज्युकेशन असे विषय पाठविले आहेत. त्यातील एक संकल्पना परिषदेची असणार आहे. परिषदेचे उद्घाटन २६ ला व समारोप २७ला होणार आहे. परिषदेसाठी असोसिएशनचे प्रतिनिधी आणि ६० कुलगुरू उपस्थित राहतील. दोन सत्रांत गटचर्चा, उद्योजकांशी संवाद साधला जाणार आहे. यावेळी उद्योग-व्यावसायिक क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित राहणार आहेत. परिषदेतील चर्चेतून समोर येणाऱ्या शिफारसी असोसिएशनच्या माध्यमातून विद्यापीठ अनुदान आयोगाला (युजीसी) सादर केले जाणार आहे. विद्यापीठाकडून नोडल आॅफिसर म्हणून डॉ. डी. आर. मोरे हे काम पाहत आहेत. विद्यापीठाने असोसिएशन आॅफ इंडियन युनिव्हर्सिटीला यंदाच्या परिषदेची संकल्पनेचे विषय गेल्या आठ दिवसांपूर्वी पाठविले आहेत. संकल्पना निश्चित झाल्यानंतरच विद्यापीठाला परिषदेच्या उद्घाटन समारंभासाठी प्रमुख अतिथी तसेच परिषदेत संकल्पनेवर आधारित विविध विषयांवर मार्गदर्शन करणाऱ्या वक्ते ठरवावे लागणार आहेत. त्यामुळे प्रशासनाला संकल्पना निश्चितीची प्रतीक्षा आहे. (प्रतिनिधी)
शिवाजी विद्यापीठात महिनाअखेरीस कुलगुरू परिषद
By admin | Published: November 05, 2015 11:35 PM