कोल्हापूर : केवळ १००० रुपयांचे फोनचे बिल थकल्याने जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्षांच्या कार्यालयातील फोनचे कनेक्शन मंगळवारी खंडित करण्यात आले; तर वीज बिलही थकल्याचे स्पष्ट झाल्याने बुधवारी यासाठी कर्मचाऱ्यांची धावपळ सुरू होती.उपाध्यक्षांकडे कृषी आणि पशुसंवर्धन विभाग असल्याने त्याच विभागाकडे ही बिले भरण्याची जबाबदारी असते. दूरध्वनीच्या बिलासाठी कृषी विभागाच्या लिपिकाकडे फाईल सादर करण्यात आली होती. मात्र संबंधित कर्मचारी रजेवर असल्याने त्यावर पुढे कार्यवाही झाली नाही. अखेर मंगळवारी (दि. १७) संध्याकाळी दूरध्वनी खात्याच्या कर्मचाऱ्यांनी फोन कनेक्शन खंडित केले.याच वेळी वीज बिल थकल्याने ‘महावितरण’चेही कर्मचारी जिल्हा परिषदेत आले होते. मात्र ‘उद्याच बिल भरतो,’ असे सांगून ती कारवाई टाळण्यात आली. दूरध्वनी खात्याकडून सध्या छापील बिले पाठविली जात नाहीत. ती मेलवर पाठविण्यात येतात. असा मेल मिळालाच नसल्याचे जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे बुधवारी दूरध्वनी खात्यात जाऊन बिल आणण्यात आले.वीज बिल उपाध्यक्षांच्या कार्यालयाकडून अदा करण्यासाठी कृषी विभागाकडे दिलेच नसल्याचे बुधवारी स्पष्ट झाले. अखेर बुधवारी हे बिल कार्यालयाकडे देण्यात आले. त्यानंतर पुढची प्रक्रिया सुरू झाली. ही दोन्ही बिले तातडीने भरली नाहीत तर संबंधित कर्मचाऱ्यांना ‘कारणे दाखवा’ नोटीस काढण्याच्या सूचना सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी रविकांत आडसूळ यांनी दिल्या.