लोकमत न्यूज नेटवर्क
इचलकरंजी : विकी-मन्या गँगमधील मोक्यातील फरार आरोपी भीमा सुभेदार चव्हाण (वय २८, मूळ रा. रांजणी, ता. कवठेमहांकाळ, जि. सांगली) याला बेड्या ठोकण्यात आल्या. जत येथील मित्राच्या शेतातील घरातून स्थानिक गुन्हे शाखेने त्याला अटक केली आहे. त्याच्यावर अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत.
याबाबत माहिती अशी, विकी खंडेलवाल, मनीष नागोरी यांच्या गँगमधील साथीदार भीमा हा विकी-मन्या गँगला पैसे, गांजा, मोबाईल पुरविण्याचे व पैशांसाठी लोकांना धमकावून खंडणी मागण्याचे काम करत होता. या आरोपाखाली त्याच्यासह विकास खंडेलवाल, मनीष नागोरी, शकील गवंडी यांच्यावर येथील शिवाजीनगर पोलीस ठाण्यात खंडणीचा गुन्हा दाखल झाला आहे. तेव्हापासून भीमा फरारी होता.
सदरची टोळी कारागृहात असतानादेखील भीमा लोकांना दहशत दाखवून खंडणी वसुलीचे व अटक आरोपींना मदत करत होता. त्या अनुषंगाने जिल्हा पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी भीमाचा शोध घेऊन तत्काळ अटक करण्याबाबत सूचना दिल्या होत्या. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक विकास जाधव यांनी सापळा रचून मंगळवारी (दि.२५) जत येथून त्याला अटक केली. पुढील तपासासाठी त्याला रामेश्वर वैजणे उपविभागीय पोलीस अधिकारी जयसिंगपूर विभागाच्या ताब्यात दिले आहे. ही कारवाई अप्पर पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड, पोलीस निरीक्षक तानाजी सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक फौजदार राजू कांबळे, पोलीस नाईक रणजित पाटील, बालाजी पाटील, प्रशांत कांबळे, पोलीस अंमलदार फिरोज बेग, महेश खोत यांनी केली आहे
(फोटो) विकी-मन्या गँगमधील मोक्यातील फरार आरोपीस अटक २६०५२०२१-आयसीएच-०२ विकी-मन्या गँगमधील मोक्यातील फरार आरोपी भीमा सुभेदार चव्हाण यास स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने अटक केली.