ऑनलाइन लोकमत
कोल्हापूर, दि. 3 - कोल्हापुरातही उष्माघातामुळे एकाचा बळी गेला आहे. शामराव सुतार (वय 50 वर्ष) यांचा उष्माघातामुळे मृत्यू झाला आहे. ते कोल्हापुरातील शाहूपुरी कुंभार गल्ली परिसरातील रहिवासी होती. दिवसभर फरशी बसवण्याचे काम केल्यानंतर शामराव रात्री कोल्हापुरातील शेळके पुलाच्या कट्ट्यावर बसले होते आणि तेथेच त्यांचा मृत्यू झाला, अशी माहिती आहे. स्थानिकांनी त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल केले. वैद्यकीय तपासणीनंतर उष्माघाताने त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
गेल्या काही दिवसांपासून चैत्रातील उन्हाचे चटके जाणवू लागले असून, वातावरणातील उष्म्याचं प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. कडाक्याच्या उन्हामुळे लोकांच्या जीव कासावीस होतोय. मराठवाड्यासह विदर्भ, मध्य महाराष्ट्र व कोकण-गोव्याच्या काही भागांत तापमाननं कमालीचा उच्चांक गाठला आहे. त्यामुळे लोकांना घराबाहेर पडणंही कठीण झालं आहे.
शिवसेना नेत्याचा उष्माघाताने मृत्यू
गेल्या आठवड्यात नाशिकमधील शिवसेनेच्या तालुका उपप्रमुखाचा उष्माघाताने मृत्यू झाला आहे. निलेश गायकवाड असे त्यांचे नाव आहे. लासलगावाजवळील विंचूर येथील ही घटना आहे. उष्माघाताचा त्रास झाल्यानंतर त्यांना उपचारांसाठी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारादरम्यान त्यांचे निधन झालं.
यंदाचे वर्ष उष्माघाताचे
दरम्यान, हवामान खात्याच्या अंदाजानुसार यंदाचे वर्ष उष्णतेच्या लाटेचे असेल. यामुळे उष्माघाताच्या बळीची संख्या वाढण्याचा धोका आहे. यावर मात करण्यासाठी नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापन विभागाने नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला.
आपत्ती व्यवस्थापन विभागाचे संचालक सुहास दिवसे यांनी सर्व विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी आणि नगरपालिकांना तातडीचे पत्र लिहिले. या पत्रातील सूचनांच्या अंमलबजावणीचे आदेश दिले आहे. उष्माघातापासून वाचण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन विभागाने १७ उपाययोजना सुचविल्या आहेत.