लोकमत न्यूज नेटवर्कसातारा : आॅस्ट्रेलियासारख्या सधन देशात ‘सातारा व्हिक्टोरिया’ नामक अलिशान गाडी फिरत असल्याचे पाहून महाराष्ट्रातील काही नेते नुकतेच चाट पडले. विधानपरिषद सभापती रामराजे, विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे, मंत्री गिरीश बापट व इतर प्रमुख मंडळींना या देशात राहणाऱ्या एका सातारकराचे भूमीप्रेम पाहून कौतुक वाटले.‘सातारा व्हिक्टोरिया’ या नावाने आॅस्ट्रेलियातील परिवहन विभागाकडे नोंदणीकृत असलेल्या आॅडी कारमध्ये फलटणचे संस्थानिक व विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांना सफर घडली. परदेशात एका दौऱ्यादरम्यान कुतूहलातून निर्माण झालेल्या ओळखीतून हा योग घडून आला.त्याचे झाले असे, साताऱ्यातील सूरज जयसिंग तुपे हे आॅस्ट्रेलियामध्ये आॅस्टेलियन ‘माजदा’ या कंपनीमध्ये आॅटोमोबाईल विभागात ‘डिपार्टमेंट हेड’ म्हणून काम करतात. नुकताच शासनातर्फे देशातील प्रमुख पदाधिकाऱ्यांचा दौरा आॅस्ट्रेलिया देशात काढला होता. या दौऱ्यासाठी विधान परिषद सभापती रामराजे नाईक-निंबाळकर, विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे, मंत्री गिरीश बापट व इतर प्रमुख मंडळी गेली होती. या दौऱ्यामध्ये आॅस्ट्रेलियातील आॅटोमोबाईल क्षेत्रातील घडामोडी जाणून घेतल्या जाणार होत्या. आॅस्ट्रेलियन माजदा कंपनीतर्फे सूरज तुपे यांना या ठिकाणी प्रेझेंटेशनसाठी कंपनीने पाठविले होते. तेव्हाच त्यांच्या गाडीच्या नंबर प्लेटवर ‘सातारा व्हिक्टोरिया’ असे लिहिलेले नाव रामराजेंच्या नजरेत नजरेला पडले. त्यांनीही कुतूहलाने याबाबत सूरज तुपे यांच्याकडे चौकशी केली. तेव्हा ‘मी साताऱ्याचा आहे, साताऱ्याविषयी ओढ असल्याने आॅस्ट्रेलियात जरी राहत असलो तरी गाडीचे रजिस्ट्रेशन ‘सातारा व्हिक्टोरिया’ या नावाने केले आहे,’ असे सूरज तुपे यांनी स्पष्ट केले. त्यावर दोघांमध्ये गप्पा झाल्या. ‘माझे बंधू प्रशांत तुपे हे सातारा जिल्हा परिषदेमध्ये नोकरी करतात,’ असे सूरज तुपे यांनी सांगितले. त्यावर ‘माझे बंधू संजीवराजेही जिल्हा परिषदेत अध्यक्ष आहेत,’ असे रामराजेंनी कोटी केली. ही ओळख झाल्यानंतर रामराजेंसह, हरिभाऊ बागडे, गिरीश बापट यांनी दोन दिवस याच गाडीतून आॅस्ट्रेलियातील मेलबोर्न शहराची सफर केली.आॅस्ट्रेलियातील सवलतीमुळे शक्यआॅस्ट्रेलियात वाहनांचे रजिस्ट्रेशन करता येते, त्याचमुळे ‘सातारा व्हिक्टोरिया’ या नावाने तुपे यांनी आपल्या आॅडी कारचे रजिस्ट्रेशन केले आहे. सातारा व्हिक्टोरियाने आॅस्ट्रेलियाशी नाते जोडले आहे.
आॅस्टे्रलियाच्या चकचकीत रस्त्यावर साताऱ्याची व्हिक्टोरिया !
By admin | Published: May 17, 2017 11:09 PM