कागल : तालुक्यातील ४८ ग्रामपंचायतींच्या निवडणुकांमध्ये महाविकास आघाडी पॅटर्नला प्रतिसाद मिळाल्याचे स्पष्ट झाले. ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, खासदार संजय मंडलिक, माजी आमदार संजय घाटगे यांच्या आघाडीने १६ ठिकाणी तर फुटीर महाविकास आघाडीने पाच ठिकाणी विजय मिळविला.
म्हाकवे, सिद्धनेर्ली, करनुर, पिंपळगाव बुद्रुक, माद्याळ, तमनाकवाडा या प्रमुख चौदा गावात सत्तांतर झाले. अन्य गावात स्थानिक गटांनी विजय मिळविले.
मंडलीक-मुश्रीफ गटाच्या युतीला ६ ठिकाणी, संजय घाटगे-मुश्रीफ गट युतीला ५ ठिकाणी तर मंडलिक-राजे गटाने ३ , राजे संजय घाटगे गटाने एक ठिकाणी सत्ता संपादन केली. मुश्रीफ राजे गटानेही एक ठिकाणी विजय मिळविला. येथील शासकीय गोडाऊनमध्ये सकाळी आठ वाजता मतमोजणीस प्रारंभ झाला. दुपारी बारा वाजता सर्व निकाल स्पष्ट झाले. जसजसे निकाल येत होते तसतसा जल्लोष होत होता. मिरवणुकाना बंदी असली तरी गुलालाचा मुक्त वापर होत होता.
सावर्डे बुद्रुक येथे मुश्रीफ गटात फूट पडली. एका गटाने समरजीत घाटगे गटाबरोबर आघाडी करीत सत्ता मिळविली. तर म्हाकवे येथे संजय घाटगे, राजे गट सत्तेत आला. वाळवे खुर्द येथे बाबासाहेब पाटील, राजे गटाने सत्ता संपादन केली. लिंगणूर कापशी येथे मुश्रीफ गट डावी आघाडी विजयी झाली. उंदुरवाडी,सोनाळी येथे मंडलिक गटाविरूद्ध सर्व गट तर मांगणूर बोळावीवाडी कासारी येथे सर्व गट एकत्र येत सत्तेवर आले आहेत.
.............
नेत्यांनी ठेवली गावे ताब्यात
ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांचे मतदान असलेले लिंगणूर दुमाला आणि विकास सेवा संस्थेशी संबध असलेल्या करनूर गावात त्यांचा गट विजयी झाला आहे. तर समरजित घाटगेचें मतदान असलेल्या शिंदेवाडीत सत्ता अबाधित राहिली. वंदुर, यमगे, साके, केनवडे भडगाव येथे मुश्रीफ संजय घाटगे युती विजयी झाली. माद्याळ, दोन्ही बेलवळे, आलाबाद, मळगे खुर्द शंकरवाडीत मुश्रीफ मंडलिक युती सत्तेवर आली आहे.
............
चिठ्ठीवर विजयी
सावर्डे बुद्रुक येथील मतमोजणी मशिन बंद पडल्याने काही काळ थाबंविली होती. तर कासारी मधील प्रभाग एक मधील अनिल नाईक व शिवाजी पाटील यांना प्रत्येकी २३० मते पडली. उदयभान बेंदकर या मुलाच्या हस्ते चिठ्ठी काढली. त्यात शिवाजी पाटील विजयी झाले.
.............
फोटो १८कागल
कागल तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकीत विजयी झालेले उमेदवार असे गुलालात रंगले होते.