विश्र्वास पाटील -
कोल्हापूर : कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून शिवसेनेचे प्रा. संजय मंडलिक यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे तगडे उमेदवार खासदार धनंजय महाडिक यांचा तब्बल .पावणे तीन लाख मतांनी दणदणीत पराभव करून इतिहास घडविला. कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून एकदा तरी शिवसेनेचा भगवा फडकविण्याचे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे स्वप्न निवडणुकीत साकार झाले. या मतदारसंघात सुरुवातीपासूनच ‘महाडिक नकोत’ अशी जी हवा तयार झाली, त्याच जनभावनेचा विजय झाल्यामुळेच मंडलिक एवढ्या मोठ्या मताधिक्याने विजयी झाले. तरुण मतदारांनी ‘मोदी हवेत’ म्हणून केलेले मतदानही मंडलिक यांचे मताधिक्य वाढविण्यात कारणीभूत ठरले. पावणेदोन लाखांच्या पुढे गेलेले मताधिक्य हा पूर्णत: मोदी लाटेचा परिणाम आहे.
मंडलिक यांच्या विजयासाठी महत्त्वाच्या दोन-तीन गोष्टी कारणीभूत ठरल्या. गेल्या निवडणुकीत ते पराभूत झाले तरी त्यांनी शिवसेना सोडली नाही. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते हसन मुश्रीफ व काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांनी त्यांना अनेकदा राष्ट्रवादीच्या उमेदवारीसाठी आग्रह धरला तरी त्यांनी त्याला शांतपणे नकार दिला. या मतदारसंघात भाजप-शिवसेनेची निश्चित मते आहेत. राज्यात व केंद्रात सत्ता युतीची आहे. पंतप्रधान मोदी यांच्याबद्दल लोकांत क्रेझ आहे आणि कोणत्याही पक्षातून निवडणूक लढविली तरी सतेज पाटील हे आपल्याला उघड पाठिंबा देणार, हे मंडलिक यांना माहीत होते; त्यामुळे शिवसेनेतूनच निवडणूक लढविण्याचा त्यांचा निर्णयच गुलाल लावून गेला.
दिवंगत माजी खासदार सदाशिवराव मंडलिक यांची पुण्याई त्यांच्या कामी आली. शिवसेना-भाजप संघटना म्हणून एकदिलाने राबल्या व त्याला सतेज पाटील यांचे मोठे बळ मिळाल्यानेच हे यश मिळाले. शिवसेनेचे आमदार चंद्रदीप नरके व प्रकाश आबिटकर हे मनापासून राबले. अशा सर्वांच्याच प्रयत्नांतून हा विजय साकारला.
कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात अगदी सुरुवातीलाच महाडिक यांच्या विरोधात जी एक हवा तयार झाली, त्यातून ही निवडणूक बाहेरच आली नाही. एकाच घरात सर्व पक्ष आणि मला वाटेल तसे राजकारण करणार, या वृत्तीला लोकांनी झिडकारले. त्यामुळे ‘महाडिक विरुद्ध सामान्य जनता’ अशीच ही लढत झाली.
महाडिक यांच्याबद्दल लोकांना चीड येण्याचे दुसरे एक महत्त्वाचे कारण म्हणजे त्यांनी गेल्या पाच वर्षांत घेतलेली सोईची राजकीय भूमिका, हीच त्यांच्यासाठी मोठी अडचणीची ठरली. राष्ट्रवादीचे खासदार असूनही ते भाजप व त्यातही पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याशी जास्त प्रामाणिक राहिले. निवडणुकीत मंत्री पाटील मदत करतील, असा महाडिक यांचा होरा चुकला. काँग्रेसचे आमदार सतेज पाटील हे विरोध करतील, याचा अंदाज महाडिक यांना होता; परंतु ते इतक्या टोकाला जाऊन थेट मैदानातच उतरतील, असे कदाचित वाटले नसावे. त्यांनी निवडणुकीच्या सुरुवातीलाच ‘महाडिकांना पाडा’ अशी उघड भूमिका घेतली. महाडिक यांच्याबद्दल नकारात्मक हवा तयार करण्यात ते कमालीचे यशस्वी झाले.
‘गोकुळ’ दूध संघ मल्टिस्टेट करण्यात महाडिक यांचा पुढाकार होता. हा दूध संघ सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या मालकीचा आहे. मल्टिस्टेट केल्यास त्यावर महाडिक यांचा कायमस्वरूपी कब्जा होईल, याबद्दलही लोकांत प्रचंड नाराजी होती. त्याचा फटका लोकसभेला खासदार महाडिक यांना बसला. ‘गोकुळ’ वाचविण्याचा मार्ग लोकसभेतून जातो, असे वाटल्यावर लोकांनी धनंजय महाडिक यांना दणका दिला.
कोल्हापूरची मानसिकता फार विचित्र आहे. या जिल्ह्याने अनेकदा कुणाला निवडून आणायचे यापेक्षा कुणाला पाडायचे, हे आधी ठरविले आहे व ते एकदा ठरले, की मग त्यावर पैशापासून अन्य कोणत्याच घटकांचा परिणाम होत नाही, असा लोकसभा व विधानसभेच्या मागच्या तीन-चार निवडणुकांतील अनुभव आहे. अशा वेळी विरोधातील उमेदवाराची पात्रता पाहण्याची तसदी लोक घेत नाहीत, याचेच प्रत्यंतर या निवडणुकीतही आले.
पाच वर्षे महाडिक ज्यांच्यासोबत राहिले तो भाजप पक्ष म्हणून विरोधात गेला व ज्यांच्याविरोधात काम केले, त्या राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या नाकदुºया काढण्याची वेळ खासदार महाडिक यांच्यावर आली. काँग्रेसचे माजी आमदार पी. एन. पाटील हे पक्षाची आघाडी म्हणून प्रचारात सक्रिय राहिले; परंतु कार्यकर्त्यांनी त्यांचे ऐकले नाही. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते हसन मुश्रीफ हे सुरुवातीपासूनच महाडिक यांच्याबद्दल नाराज होते. त्यांची उमेदवारी बदलण्याची जाहीर मागणी त्यांनी केली होती; त्यामुळे पक्षादेश म्हणून ते प्रचारात महाडिक यांच्यासोबत राहिले; परंतु ही जागा जिंकायच्याच भावनेने ते मैदानात उतरल्याचे एकदाही दिसले नाही. गेल्या निवडणुकीत महाडिक यांना करवीर, राधानगरी व कोल्हापूर दक्षिण मतदारसंघाने चांगले मताधिक्य दिले होते; परंतु या निवडणुकीत पहिल्या फेरीपासूनच त्यांना एकाही फेरीत कोणत्याच मतदारसंघात मताधिक्य मिळाले नाही, एवढा स्पष्ट कौल जनतेने दिल्याने महाडिक यांचा मोठा पराभव झाला.
उमेदवार म्हणून महाडिक यांची प्रतिमा प्रभावी होती; त्यामुळे लोक काम पाहून मते देतील, असा त्यांचा कयास होता. अरुंधती महाडिक यांनी केलेले भागीरथी संस्थेचे संघटन, युवाशक्तीची ताकद, महाडिक गट म्हणून असलेले बळ, गोकुळ दूध संघाचे पाठबळ या बळावर आपण नक्की विजयी होऊ, असे त्यांना मतमोजणी सुरू होईपर्यंत वाटत होते; परंतु यांतील एकही गोष्ट त्यांच्या मदतीला आली नाही. मोदी लाटेत या सगळ्याच गोष्टी वाहून गेल्या.संजय मंडलिक यांच्या विजयाची पाच कारणेनवमतदार व तरुणाईसह मोदी लाटेचा फायदाभाजप-शिवसेना युतीचे एकत्रित बळसतेज पाटील यांच्या ‘आमचं ठरलंय’ची ताकदस्वर्गीय सदाशिवराव मंडलिक यांची पुण्याईदोन्ही काँग्रेसची छुपी व उघड मदत.धनंजय महाडिक यांच्या पराभवाची पाच कारणेपक्षविरोधी काम व लोकांना गृहीत धरण्याची चूकजिल्हा परिषद निवडणुकीतील ‘ड्रायव्हर’कीमहाडिक कुटुंबात सत्ता एकवटल्याने नाराजीदोन्ही काँग्रेसची मनापासून साथ नाहीगोकुळ ‘मल्टिस्टेट’ करण्याचा डाव अंगलट.