राजाराम लोंढे कोल्हापूर : कुडित्रे (ता. करवीर) येथील कुंभी कासारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत माजी आमदार चंद्रदीप नरके यांनी पॅनलच्या बांधणीपासून अगदी शिस्तबद्ध राबविलेली प्रचार यंत्रणा आणि शेवटच्या टप्प्यात त्यांना एकाकी पाडण्याचा विरोधकांनी केेलेला प्रयत्न व त्यातून निर्माण झालेली सहानुभूती या सगळ्यांमुळे विजयी चौकार खेचण्यात यश आले. या विजयामुळे आगामी विधानसभा निवडणुकीसाठी नरके यांचा आत्मविश्वास दुणावणार हे निश्चित आहे.
सत्तांतर करायचेच, या इराद्याने रिंगणात उतरलेल्या ‘शाहू’ आघाडीने चिवट झुंज दिली, मात्र अंतर्गत उट्टे काढण्याचे राजकारण व सगळे एकत्र येऊन कारखाना चालवू शकतो, हा सभासदांना विश्वास देण्यात कमी पडल्याचा त्यांना फटका बसला.विधानसभेतील पराभवानंतर चंद्रदीप नरके यांचे राजकीय खच्चीकरण झाले होते. ‘गोकुळ’च्या निवडणुकीत दोन संचालक निवडून आणत त्यांनी पॅचवर्क करण्याचा प्रयत्न केला, मात्र ‘करवीर’च्या राजकारणात ‘कुंभी’ची सत्ता महत्त्वाची ठरत असल्याने नरके यांनी दोन वर्षे जोडण्या लावल्या होत्या. नरके यांच्याकडून कारखाना काढून घेण्याचा चंग बांधून गेल्या पाच- सहा वर्षांत विरोधकांनी कारभाराविरोधात सातत्याने आवाज उठवत कारखान्याची निवडणूक सोपी नाही, असा सत्तारूढ गटाला इशारा दिला होता.
सुरुवातीच्या टप्प्यात विरोधकांमध्ये दोन-तीन गट असले तरी त्यांनी ‘गोकुळ’चे संचालक बाळासाहेब खाडे यांच्या नेतृत्वाखाली एकाच जाजमावर आणून तगडे पॅनल रिंगणात उतरवले. आता नाहीतर कधीच नाही, हे ओळखून खाडे यांनी कमालीच्या जोडण्या लावल्या होत्या. या पॅनलमधील ‘मोहरे’ हे भविष्यातील राजकारणात अडसर ठरणार, म्हणून त्यांना आताच रोखायला हवे, यासाठी एक यंत्रणा सक्रिय झाली आणि त्याचा फटका ‘शाहू’ आघाडीला बसला.सतेज यांच्या पाठिंब्यामुळे नरकेंना बळ‘कुंभी’च्या निवडणुकीत चंद्रदीप नरके यांना एकाकी पाडत त्यांची कोंडी करण्याची व्यूहरचना विरोधकांची होती. मात्र, आमदार सतेज पाटील यांच्या पाठिंब्याने नरकेंचा हुरूप वाढवलाच, त्याचबरोबर करवीरमधील विरोधकांचे मताधिक्य कमी करण्यात त्यांची भूमिका निर्णायक ठरली.पन्हाळकरांनी चूक सुधारलीविधानसभा निवडणुकीत चंद्रदीप नरके यांना अपेक्षित मताधिक्य न मिळाल्याने त्यांचा पराभव झाला होता. त्याची सल नरके यांना कायम बोचत होती. त्यादृष्टीने त्यांनी गेली दोन वर्षे बांधणी सुरू केली होती. तेथील मताधिक्य पाहता पन्हाळकरांनी चूक सुधारल्याची चर्चा सुरू आहे.अजित यांची ‘चाणक्यनीती’अजित नरके हे या निवडणुकीतील पडद्यामागचे सूत्रधार होते. अरुण नरके हे साथ देणार नाहीत, हे गृहित धरून त्यांनी पन्हाळा व गगनबावड्यात जोडण्या लावल्या. त्यांची चाणक्यनीती पुन्हा एकदा पथ्यावर पडली.
नरके पॅनलच्या विजयाची कारणे :
- शेतकऱ्यांचा एक रुपयाही थकीत नाही
- सतेज पाटील यांचे पाठबळ
- अरुण नरके यांच्या भूमिकेनंतर विशेषत: पन्हाळ्यात फिरलेले वारे
- नरके घराण्याबाबत सभासदांमध्ये असलेली आत्मियता
‘शाहू’ पॅनलच्या पराभवाची कारणे :
- सांगरुळ व कुडित्रे गटात न मिळालेले अपेक्षित मताधिक्य
- पन्हाळ्यातील हवा मतपेटीपर्यंत पोहोचलीच नाही.
- कारखाना चालवू शकतात, हा विश्वास सभासदांना देण्यात कमी पडले.