- संदीप आडनाईक कोल्हापूर - टी-२० वर्ल्डकप २०२४ च्या १९व्या सामन्यात रविवारी भारताने पाकिस्तानविरुद्ध विजय मिळवताच कोल्हापुरात रविवांरी मध्यरात्री क्रिकेटप्रेमींनी जल्लोष केला. या क्रिकेट स्पर्धेतील भारताच्या विजयानंतर येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात तरुण क्रिकेट प्रेमींनी एकच जल्लोष केला. पारंपरिक प्रतिस्पर्धी असणाऱ्या भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यामध्ये न्यूयॉर्कच्या नासाऊ काउंटी आंतरराष्ट्रीय स्टेडियममध्ये हा सामना झाला. याच मैदानावर भारताने आयर्लंडला पराभवाचं पाणी पाजलं होते. पाकिस्तानचा संघ पहिल्यांदाच या मैदानावर खेळला. एकतर्फी विजय मिळवत भारतीय संघाने स्पर्धेतील आपली घोडदौड सुरू ठेवली.
विजयाची चाहूल लागताच अनेक तरुणांनी आपला मोर्चा चौकाकडे वळवला. विजय जवळ येईल तसे राष्ट्रध्वज व भगव्या झेंड्यांसह गर्दी वाढू लागली. स्पीकरवर विजयी गीत वाजवत अनेकजण चौकात थिरकू लागले. विजयावर शिक्कामोर्तब होताच एकच जल्लोष, आतषबाजी करण्यात आली. सुमारे तासभर चाललेल्या जल्लोषानंतर पोलिसांनी येथील गर्दी पांगवत परिसर मोकळा केला.