आॅनलाईन लोकमतकोल्हापूर, दि. २४ : काश्मीरच्या नियंत्रणरेषेवर पाकिस्तानसोबत लढताना धारातीर्थी पडलेले भारतीय जवान सावन माने यांच्या पार्थिवावर विराट गर्दीत शनिवारी दुपारी १ वाजून ४५ मिनिटांनी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. सावन माने यांच्या पार्थिवाला त्यांचे बंधू सागर यांनी अग्नी दिला.जम्मू-काश्मीरमधील पुंछ सेक्टरध्ये पाकिस्तानी लष्कराच्या हल्ल्यात कोल्हापूर जिल्ह्यातील शाहूवाडी तालुक्यातील गोगवे गावचे सुपूत्र सावन माने हे शहिद झाले होते. माने यांचे पार्थिव शनिवारी सकाळी लष्करी हेलिकॉप्टरमधून पुण्याहून कोल्हापूर येथील विमानतळावर आणण्यात आले. या ठिकाणी त्यांना टी. ए. बटालीयनच्या जवानांनी शस्त्रसलामी देऊन मानवंदना देण्यात आली. माने यांचे पार्थिव शुक्रवारी लष्करी हेलिकॉप्टरने पूँछहून जम्मू येथे व त्यानंतर जम्मूहून दिल्ली व दिल्लीहून पुणे येथे मध्यरात्री आले. येथील लष्करी रुग्णालयात हे पार्थिव ठेवण्यात आले होते. पुण्यातून शनिवारी सकाळी ९ वाजता हे पार्थिव लष्करी हेलिकॉप्टरने कोल्हापूर विमानतळ येथे आणण्यात आले. या ठिकाणी सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे, जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार, पोलिस अधिक्षक संजय मोहिते, निवासी उपजिल्हाधिकारी संजय शिंदे, लष्कराच्या कोल्हापूर स्टेशन हेडकॉर्टरचे अॅडम कमांडर कर्नल कावेरीअप्पा, टी. ए. मराठा बटालियन, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी कर्नल सुभाष सासने आदी उपस्थित होते. टी. ए. मराठा बटालियनच्या जवानांनी हेलिकॉप्टरमधील शहिद माने यांचे पार्थिव विमानतळाबाहेर तयार केलेल्या मानवंदनेच्या ठिकाणी आणले. यावेळी तिरंग्यात लपेटलेल्या शहिद माने यांच्या पार्थिवाला सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे यांनी शासनाच्या वतीने पुष्पचक्र वाहून आदरांजली वाहीली. जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार व पोलिस अधिक्षक संजय मोहिते यांनी जिल्हा प्रशासनाच्यावतीने पुष्पचक्र वाहून आदरांजली वाहिली. यानंतर लष्कराच्यावतीने टी. ए. बटालियनच्या जवानांनी शहिद माने यांच्या पार्थिवाला शस्त्रसलामी देऊन मानवंदना दिली. यावेळी काही काळ स्तब्ध राहून उपस्थितांनी आदरांजली वाहिली. यानंतर त्यांचे पार्थिव लष्कराच्या वाहनातून त्यांच्या गावी गोगवेपैकी तळपवाडी येथे अंत्यसंस्कारासाठी निघाले. सकाळी ११ वाजता त्यांचे पार्थिव गोगवे गावात आणण्यात आले. सावन यांच्या राहत्या घरी त्यांचे पार्थिव कांही काळ अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले. त्याठिकाणी त्यांच्या आई-वडिलांनी, ग्रामस्थांनी तसेच सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे, जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार व पोलिस अधिक्षक संजय मोहिते यांनी पार्थिवाचे अंतिम दर्शन घेतले. यावेळी परिसरातील लोकप्रतिनिधीही उपस्थित होते. यावेळी पंचक्रोशीतील नागरिकांनी सजवलेल्या ट्रॉलीवरुन अंत्ययात्रा काढण्यात आली.
पंचक्रोशीतील व्यवहार ठप्प
शाहूवाडी आणि गोगवेपैकी तळपवाडी या गावच्या दुतर्फा ग्रामस्थ सकाळपासून या शहीद जवानाला मानवंदना देण्यासाठी उभे होते. या परिसरातील जनसागर या गावच्या हद्दीत उपस्थित होता. सावन शहीद झाल्याचे समजताच गावातील व्यवहार पूर्णपणे बंद ठेवण्यात आले होते. यावेळी पंचक्रोशीतील शाळेतील विद्यार्थी सावन माने अमर रहे असे फलक हातात घेउन उपस्थित होते. यावेळी ग्रामस्थांनी वंदे मातरम, भारतमाता की जय अशा घोषणा देत सावन यांना मानवंदना दिली.
बंधूच्या हस्ते भडाग्नी
सावन यांच्या पार्थिवाला गावातीलच गायरान क्षेत्रात त्यांचे बंधू सागर यांच्या हस्ते भडाग्नी देण्यात आला. यावेळी लष्कराने तसेच पोलिसांनी बंदुकीतून हवेत तीन फैरी झाडून त्यांना मानवंदना देण्यात आली.
https://www.dailymotion.com/video/x8456bh