कोल्हापूर - उत्तम व्यवस्था उभा करणं हे सर्वात मोठं चॅलेंज प्रशासन आणि स्वयंसेवी संस्थांसमोर आहे. मात्र, प्रशासन आणि स्वयंसेवी संस्थांनी हे चॅलेंज स्विकारले आहे. घरी होणार नाही, इतकी चांगली व्यवस्था उपलब्ध आपण करुन देत आहोत, असे महसूलमंत्री आणि कोल्हापूरचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे. पंचनामे झाल्यानंतर सरकार सगळी नुकसानभरपाई देईल. सरकार पूर्णपणे लोकांच्या पाठीशी असल्याचेही पाटील यांनी आश्वस्त केले आहे.
कोल्हापुर आणि सांगतालीतील पूरपरिस्थिती सामान्य करण्याचे काम वेगाने सुरू आहे. शिरोळ तालुक्यात मदतीसाठी पथके पाठविण्यात आली आहेत. नागरिकांच्या मदतीसाठी राज्य व केंद्र शासन सर्व मार्गाने प्रयत्न करत आहे. त्यामुळे नागरिकांनी घाबरून जाऊ नये, असे आवाहन पाटील यांनी केले आहे. तसेच, शासन सर्वोतोपरी नागरिकांच्या पाठिशी असल्याचेही त्यांनी म्हटले. पाणी ओसरल्यानंतर गावागावात खूप मदत करावी लागणार आहे. सरकारने आपल्या जीआरमध्ये अशा परिस्थितीमधील मदतीच्या रकमेत वाढ केली आहे. 2.5 हजार रुपयांवरुन मदत रक्कम 10 हजार रुपये एवढी वाढवली आहे. तसेच, चेकऐवजी रोख स्वरुपात ही रक्कम देण्यात येणार असल्याचेही चंद्रकात पाटील यांनी म्हटले आहे. दरम्यान, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा व संरक्षण मंत्री राजनाथसिंह हे राज्य शासनाच्या संपर्कात असून केंद्राकडून लागेल ती मदत करण्यासाठी सूचना दिल्या आहेत. बचाव पथकाने आतापर्यंत 2 लाख 52 हजार 813 जणांना सुरक्षित स्थळी हलविले आहे.