ऑनलाइन लोकमत
कोल्हापूर, दि. 17 - केंद्र सरकारच्या नोटाबंदीच्या निर्णयाचा फटका सर्वसामान्यांच्या दैनंदिन जीवनावर होत आहे. नोटांच्या कमतरतेमुळे भाजीपाल्यांसह कांदा-बटाटा मार्केटही थंडावले आहेत. यामुळे बाजारात कांदा, बटाटा, भाजीपाल्याचा तुटवडादेखील जाणवू लागला आहे.
शहरातील राजर्षी शाहू मार्केट यार्डमधील भाजीपाला मार्केटमध्ये स्थानिक शेतक-यांकडून आलेल्या शेतमालाला रास्त भाव मिळेनासा झाला आहे. शेतकरीदेखील 500, 1000 रुपयांच्या नोटा स्वीकारत नसल्याने व्यापा-यांना उधारीवर मालाची खरेदी-विक्री करावी लागत आहे. यामुळे शेतक-यांसहीत व्यापारी हवालदील झाले आहेत.
ज्यांच्याकडे 20, 50 आणि 100 रुपयांच्या नोटा आहेत, त्या व्यापा-यांकडेच मालाचा उठाव सुरू आहे. तर अन्य व्यापा-यांना कमी दराने आणि उधारीवर भाजीपाला विक्री करावी लागत आहे. शिवाय, दिवसभरात शेतमालाचा उठाव न झाल्याने मोठ्या प्रमाणात माल तसाच शिल्लक राहत आहे. यामुळे घाऊक बाजारावर मोठा परिणाम झाल्याचे पाहायला मिळत आहे.
तसेच शेतमालाचे नुकसान होण्याची देखील शक्यता आहे. परिणामी, भाजीपाल्याचे दर दिवसेंदिवस कमी होऊ लागल्याने शेतक-यांसहीत व्यापा-यांनादेखील याचा फटका बसत आहे.
8 नोव्हेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काळा पैसा हद्दपार करण्यासाठी चलनातून 500, 1000 रुपयांच्या जुन्या नोटा रद्द करण्याचा निर्णय घेतला. या ऐतिहासिक निर्णयाचे सर्वसामान्यांनी स्वागत केले असेल तरी दैनंदिन जीवनावर परिणाम होत असून समस्या निर्माण होऊ लागल्या आहेत.
https://www.dailymotion.com/video/x844i75