Vidhan Parishad Election : तीन मंत्र्यांच्या उपस्थितीत सतेज पाटीलांनी भरला उमेदवारी अर्ज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 18, 2021 01:59 PM2021-11-18T13:59:40+5:302021-11-18T14:00:33+5:30
सतेज पाटील यांचा विजय काळ्या दगडावरची पांढरी रेष आहे, असा दावा महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केला. अर्ज दाखल करतेवेळी महाविकास आघाडीतील तीन मंत्र्यांची उपस्थितीती.
कोल्हापूर : विधान परिषद निवडणुसाठी महाविकास आघाडीतर्फे कोल्हापुरातून पालकमंत्री सतेज पाटील यांनी आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. पालकमंत्री पाटील यांनी निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्याकडे उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत, आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील- यड्रावकर, आमदार पी. एन. पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.
विधान परिषद कोल्हापूर स्थानिक प्राधिकारी व्दिवार्षीक निवडणुकीसाठी एकूण ४१६ पैकी २७० मतांचा पाठिंबा पालकमंत्री सतेज पाटील यांना आहे. त्यामुळे पाटील यांचा विजय काळ्या दगडावरची पांढरी रेष आहे, असा दावा महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केला. उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.
यावेळी सतेज पाटील म्हणाले, शिवसेना, राष्ट्रवादी, कॉंग्रेस पक्षाच्या महाविकास आघाडीतर्फे मी उमदेवारी अर्ज दाखल केला आहे. नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्यांच्या माध्यमातून अनेक विकास कामे मार्गी लावली आहेत. यामुळे गेल्या वेळपेक्षा आताची निवडणूक माझ्यासाठी सोपी आहे. सध्यस्थितीत मला २७० मतदारांनी पाठिंबा दिला आहे. यामुळे विजय निश्चित आहे.