Vidhan Parishad Election : शौमिका की राहूल आवाडे हे उद्यापर्यंत ठरणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 12, 2021 01:45 PM2021-11-12T13:45:27+5:302021-11-12T13:55:43+5:30
भाजप आणि मित्रपक्षांच्या गुरुवारी झालेल्या बैठकीत विधानपरिषदेच्या निवडणुकीसाठी जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष शौमिका महाडिक आणि सदस्य राहुल आवाडे यांच्या नावांबाबत प्रामुख्याने चर्चा झाली असून, उद्या, शनिवारपर्यंत अंतिम निर्णय घेण्यात येणार आहे.
कोल्हापूर : भाजप आणि मित्रपक्षांच्या गुरुवारी झालेल्या बैठकीत विधानपरिषदेच्या निवडणुकीसाठी जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष शौमिका महाडिक आणि सदस्य राहुल आवाडे यांच्या नावाबाबत प्रामुख्याने चर्चा झाली असून, उद्या, शनिवारपर्यंत अंतिम निर्णय घेण्यात येणार आहे. उमेदवार निवडीचे अधिकार भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना देण्यात आले असून, ते ठरवतील त्यांनाच ही उमेदवारी मिळण्याची शक्यता जास्त आहे. आमदार पाटील यांचा कल पाहता शौमिका महाडिक यांची शक्यता जास्त वाटत आहे.
प्रदेशाध्यक्ष आमदार पाटील यांनी हॉटेलमध्ये ही बैठक दोन टप्प्यांत घेतली. यावेळी आमदार विनय कोरे, आमदार प्रकाश आवाडे, माजी खासदार धनंजय महाडिक, माजी आमदार सुरेश हाळवणकर, अमल महाडिक, राहुल आवाडे, प्रा. जयंत पाटील, सुमित कदम उपस्थित होते. बैठकीनंतर सायंकाळी आमदार पाटील यांनी शिरोली येथे जाऊन माजी आमदार महादेवराव महाडिक यांची भेट घेतली व निवडणूक रणनीतीबाबत चर्चा केली.
यावेळी झालेल्या बैठकीत भाजपचे चिन्हावर असलेले नगरसेवक आणि जिल्हा परिषद सदस्य, आवाडे यांची ताराराणी आघाडी आणि कोरे यांच्या जनसुराज्य पक्षाचे असलेले सदस्य, नगरसेवक तसेच या सर्वांना मानणारी मंडळी अशांबाबत प्राथमिक चर्चा करण्यात आली. कोणत्याही परिस्थितीमध्ये ताकदीने निवडणूक लढविण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला. याचवेळी पक्षाच्या पाठबळाविषयीही चर्चा झाली.
पक्षाचे बळ हवेच..
सत्तेत असलेल्या पालकमंत्री सतेज पाटील यांना विरोध करताना त्यांच्या विरोधात ताकदीने उतरावे लागेल. अशावेळी भाजपने पक्ष म्हणून सर्व पाठबळ देण्याची अपेक्षा बैठकीत व्यक्त झाली.
भाजपचा जीव भांड्यात
आजच्या या बैठकीला विनय कोरे उपस्थित राहणार का नाही याची राजकीय वर्तुळात उत्सुकता होती. कारण कोरे यांनी राज्याच्या राजकारणात भाजपसोबत आणि जिल्ह्यात महाविकास आघाडीसोबत अशी भूमिका मांडली होती. परंतु, कोरे यांच्या उपस्थितीमुळे भाजपचा जीव भांड्यात पडल्याचे सांगितले जाते.
मुंबईत होणार शिक्कामोर्तब
शौमिका महाडिक की राहुल आवाडे यापैकी एका नावावर शनिवारी मुंबईत शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. प्रदेशाध्यक्ष पाटील यांनी या बैठकीत अपेक्षित माहिती घेऊन ते आता विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करणार असल्याचे सांगण्यात आले. उमेदवार निवडीचे अधिकार आमदार चंद्रकांत पाटील यांना देण्यात आले.
महादेवराव महाडिक रिंगणाबाहेर..
या बैठकीला माजी आमदार महादेवराव महाडिक उपस्थित नव्हते. या निवडणुकीत ते उमेदवार असणार नाहीत हे बैठकीनंतर स्पष्ट झाले. आमदार आवाडे यांनीही महाडिक कुटुंबातील कोण असेल तर त्यांचा प्राधान्याने विचार व्हावा असे सुचविल्याचे समजते.
उमेदवार भाजपचाच..
ही निवडणूक भाजप पुरस्कृत न लढता भाजपच्यावतीनेच लढविण्यात येणार आहे. जो कुणी उमेदवार असेल त्यास भाजपचाच एबी फॉर्म भरावा लागेल. त्या उमेदवारास कोरे-आवाडे यांनी पाठिंबा द्यायचा असे निश्चित झाले.
हाळवणकर यांचा नकार..
बैठकीत माजी आमदार सुरेश हाळवणकर यांनी ही निवडणूक लढविण्यास स्वत:हून नकार दर्शविला. मी जनतेतून निवडणूक लढविणारा कार्यकर्ता असल्याची भूमिका त्यांनी घेतली. पक्षाने आदेश दिला तर मात्र रिंगणात उतरावे लागेल, असेही त्यांनी स्पष्ट केले. प्रा. जयंत पाटील यांनाही उमेदवारीबाबत विचारणा झाली. त्यांनी आर्थिक मर्यादा असल्याचे स्पष्ट केले.
आमची बैठक झाली. मित्रपक्षाचे नेते आवर्जून या बैठकीला उपस्थित होते. परिस्थितीचा आढावा घेता या निवडणुकीत आम्ही सतेज पाटील यांना हरवू शकतो असा आम्हाला विश्वास आहे. त्यामुळे दोनच दिवसांत उमेदवार निश्चित करून मोर्चेबांधणी सुरू करू.
- आमदार चंद्रकांत पाटील, भाजप प्रदेशाध्यक्ष