- समीर देशपांडे
कोल्हापूरच्या छत्रपती घराण्याचा एक आदरयुक्त दबदबा कोल्हापूर जिल्ह्यात आहे. या घराण्यानेही आपण शिवाजी महाराजांचे, शाहू महाराजांचे वारसदार आहोत ,याची जाणीव ठेवत या आदराला धक्का लागेल अशी कोणतीही कृती केलेली नाही. तरीही स्वच्छ प्रतिमा, राजघराण्याचे वलय असले तरी मालोजीराजे यांनी २00४ साली विधानसभा लढवून बाजी मारली, हा अपवाद वगळता लोकसभेच्या एका आणि विधानसभेच्या एका निवडणुकीत या घराण्यातील सदस्यांना पराभव स्वीकारावा लागला.
आताही विधानसभेसाठी मालोजीराजे यांच्या पत्नी आणि दिवंगत मंत्री दिग्विजय खानविलकर यांच्या कन्या मधुरिमाराजे यांच्या नावाची चर्चा माध्यमांमधून जोरदारपणे सुरू आहे. खानविलकर समर्थकांची मोठी इच्छा आहे की मधुरिमाराजे यांनी रिगंणात उतरावे. मात्र, यासंदर्भात अजून कोणतेच स्पष्टीकरण दिले जात नसल्याने संभ्रम वाढला आहे.
विद्यमान छत्रपती शाहू महाराज १९९५ च्या नंतर शिवसेनेशी संबंधित होते. परंतू, नंतर मात्र त्यांनी कोणत्याही राजकीय पक्षाशी थेट संबंध ठेवले नाहीत. सर्वपक्षीयांशी स्नेहाचे संबंध हेच त्यांचे वैशिष्ट्य राहिले. मात्र याला पहिला छेद देत त्यांचे कनिष्ठ चिरंजीव मालोजीराजे यांनी २00४ साली विधानसभेची निवडणूक लढवली आणि शिवसेनेचे तत्कालीन विद्यमान आमदार सुरेश साळोखे यांचा पराभव केला. ही जागा राष्ट्रवादीकडे असताना एका रात्रीत शरद पवार यांनी सोनिया गांधी यांच्याशी चर्चा करून त्यांना काँग्रेसमध्ये पाठवले आणि काँग्रेसच्या तिकीटावर मालोजीराजे आमदार झाले.
यानंतर २00९ साली लोकसभेची निवडणूक जाहीर झाली आणि राष्ट्रवादीचे तत्कालीन विद्यमान खासदार सदाशिवराव मंडलिक यांना उमेदवारी नाकारून धनंजय महाडिक यांना उमेदवारी देण्याचा विचार केला गेला. मात्र काँग्रेसमधीलच काही नेत्यांनी महाडिक यांना विरोध केला आणि महाडिकांची उमेदवारी रद्द झाली. ती संभाजीराजे यांना जाहीर झाली. परंतू संतापलेल्या महाडिकांनी सर्व ताकद शरद पवार यांच्याविरोधात दंड थोपटलेल्या अपक्ष मंडलिक यांच्या पाठिशी लावली. परिणाम व्हायचा तोच झाला आणि मंडलिक यांनी संभाजीराजे यांचा पराभव केला.
याच पराभवाची पुनरावृत्ती होत २00९ च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचे युवा शहराध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी मालोजीराजे यांचा पराभव केला. सहा महिन्यात छत्रपती घराण्याला दोन वेळा पराभवाचा सामना करावा लागला. त्यानंतर मालोजीराजे यांनी पुण्यातील ऑल इंडिया शिवाजी एज्युकेशन सोसायटीच्या कामात पूर्ण लक्ष घातले. सध्याही ते कोल्हापूरपेक्षा पुण्यातच अधिक काळ असतात.
याच दरम्यान पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले. लोकसभेतील पराभवानंतर खचून न जाता संभाजीराजे यांनी मराठा आरक्षणाच्या मुदद्यावर महाराष्ट्रभर दौरे सुरू केले. युवा पिढीचा त्यांना चांगला प्रतिसाद मिळू लागला. प्रत्येक जिल्ह्यात त्यांच्या सभांना गर्दी होवू लागली. हीच बाब हेरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संभाजीराजे यांच्याशी चर्चा केली आणि थेट राष्ट्रपती नियुक्त राज्यसभा सदस्य म्हणून संभाजीराजेंचा सन्मान केला. जे काँग्रेस, राष्ट्रवादीला करता येणे शक्य होते ते न केल्याने भाजपने हीच संधी साधत संभाजीराजेंना राज्यसभा दिली आणि छत्रपती घराण्यामध्ये एक महत्वाचे पद आहे.
आता पुन्हा विधानसभेच्या तोंडावर मालोजीराजे यांच्या पत्नी मधुरिमाराजे कोल्हापूर उत्तर मधून निवडणूक लढवणार असल्याची चर्चा आहे. परंतू याबाबत अजूनही स्पष्टपणे कुणीच भूमिका जाहीर न केल्याने काय निर्णय घेतला जाणार याची उत्सुकता राजकीय वर्तुळात लागून राहिली आहे.