कोल्हापूर : कोल्हापूरात पंचगंगा नदीच्या पात्रातील पाणी आटल्याने अनेक वर्षापासून पाण्यात असलेली अनेक प्राचीन मंदिरे खुली झाली आहेत. त्यामुळे ती पाहण्यासाठी भाविक गर्दी करत आहेत. काळानुरुप आणि गाळ साठत राहिल्याने नदीचा मार्ग बदललेला असून दीडशे वर्षापासून साठलेला हा गाळ काढल्यास नदी मूळ मार्गाने प्रवाहित होईल, असे मत मंदिर अभ्यासक उमाकांत राणिंगा यांनी व्यक्त केले आहे.पंचगंगा नदीचा मार्ग अग्नेय दिशेला सरकल्यामुळे पूर्वी नदीच्या काठावर असणारी विविध प्राचीन मंदिरे पाण्यात गेली आहेत. शिवाजी पूल जेव्हा बांधण्यात आला, तेव्हाचा आराखडा उपलब्ध आहे. त्यावेळी जो मार्ग होता, त्या मार्गाने नदी पूर्ववत वाहू लागली तर आता पाण्यात असलेल्या मंदिरांना धोका पोहोचणार नाही.गेल्या अनेक वर्षात या नदीचा मार्ग बदलत गेला आहे. पाण्याच्या चक्राकार प्रवाहामुळे नदीसोबतचा माती आणि अन्य वस्तूंचा गाळ वायव्य दिशेला साठत गेला आहे. तो भराव हळूहळू इतका मोठा झाला की, नदी त्याला वळसा घालून पुढे जाउ लागली. त्यामुळे पूर्वी काठावर असणारी प्राचीन मंदिरे पाण्याखाली गेली आहेत.
पायथे, चबुतरे, बैठका, दीपमाळा, शिलालेख
यासह अनेक अज्ञात मंदिरे, त्यांचे पायथे, चबुतरे, बैठका, दीपमाळा तसेच काही शिलालेखही पहायला मिळतात. यातील अनेक मंदिरे ढासळली आहेत. घाटावरच्या मागील बाजूस असलेली काही मंदिरेही ढासळलेली आहेत. याचा अभ्यास केल्यास नवीन माहिती उघडकीस येण्याची शक्यता आहे.