कोल्हापूर : मराठमोळी संस्कृती, मराठी परंपरा जपणारे व ग्रामीण भागातील जीवनाचे हुबेहूब दर्शन घडविणारे ‘गावगाडा’ छायाचित्र प्रदर्शनास शाहू स्मारक भवनात मोठ्या उत्साहात सुरुवात झाली.
फोटो फॅक्टरी प्रस्तुत व अतुल भालबर व स्मिता कुंभार या छायाचित्रकारांनी प्रदर्शनात मांडलेल्या छायाचित्रांमध्ये ग्रामीण जीवनात दैनंदिन घडणारे प्रसंग जवळून टिपले आहेत. अनेक छायाचित्रे पाहिल्यानंतर जुन्या आठवणींचीही जाणीव होते. कालबाह्य होत चाललेले अनेक प्रसंग नव्या पिढीला संस्कारासाठी ठेवा ठरतील, असे टिपले आहेत. विशेष म्हणजे शेतामध्ये काम करून आल्यानंतर आजोबा नातीकडून पाठ तुडवून घेतानाचे छायाचित्र पाहिल्यानंतर आजोबांचे भाव अगदी स्पष्ट टिपले आहेत. दारात वाट पाहणारी स्त्री, खुराडे सारवताना, लहान बाळाला शिशाच्या दिव्याखाली चोळणारी आजी, मुलाली सागरगोट्या शिकवणारी आई, आपल्या नातवंडांना गोष्ट सांगणारे आजोबा आदी कुठेही पाहण्यास न मिळणारी छायाचित्रे या प्रदर्शनात मांडण्यात आली आहेत. विशेषत: प्रदर्शन पाहण्यासाठी कला दालनात पाय ठेवल्यानंतर प्रत्यक्षात गावातच असल्याचा भास ‘गावगाडा’च्या रुपाने रसिकांना येत आहे. कोरोनाच्या काळातही काळजी घेऊन दर्दी रसिक उत्स्फूर्त प्रतिसाद देत आहेत.
फोटो : २२०३२०२१-कोल- गावगाडा
आेळी : राजर्षी शाहू स्मारक भवनात सुरू असलेल्या ‘गावगाडा’ या प्रदर्शनातील एक आजोबा आपल्या नातीकडून पाठ तुडवून घेतानाचे छायाचित्र लक्षवेधी ठरले.