संकेश्वर : संकेश्वरात वरिष्ठ दिवाणी न्यायालय (सीनिअर डिव्हिजन कोर्ट) स्थापन करण्यात यावे, तसेच यमकनमर्डी (ता. हुक्केरी) येथे नवीन जीएमएफसी कोर्ट स्थापन करण्यास संकेश्वरातील वकील संघटनेने विरोध दर्शविला आहे. त्याविरोधात संकेश्वर येथील वकील संघटनेने कामकाजावर बहिष्कार घालून बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले आहे. याबाबतचे निवेदन संंबंधित न्यायाधीश व मुख्यमंत्री एस. सिद्धरामय्या यांना देण्यात आले. वकील संघटनेचे अध्यक्ष एम. बी. बालनाईक म्हणाले, तालुक्यात हुक्केरी व संकेश्वरात न्यायालय आहे. ७०टक्के कोर्ट केसीस संकेश्वर भागातील आहेत. तेव्हा यमकनमर्डीत कोर्ट उपयोगी ठरणार नाही. त्याऐवजी येथेच वरिष्ठ दिवाणी कोर्ट होणे गरजेचे आहे. संकेश्वरात १९९७ मध्ये जीएमएफसी कोर्ट मार्केट यार्डात सुरू झाले. तद्नंतर कर्नाटक सरकारने १६ कोटी रुपये खर्चून नव्याने तीन मजली सुसज्ज न्यायालयाची इमारत गत दोन वर्षांपूर्वी बांधून दिली आहे. न्यायालयीन कामकाजास ३० कर्मचारी वर्ग उपलब्ध आहेत, तर येथे १२० हून अधिक वकिलांची संख्या आहे. विशेषत: तालुक्यात २ कोर्ट असताना यमकनमर्डीत पुन्हा कोर्ट स्थापनेचा काहींनी प्रयत्न चालविल्याने चर्चेचा विषय बनला आहे. धरणे आंदोलनात संघाचे अध्यक्ष एम. बी. बालनाईक, एस. पी. शिरणे, पी. एस. पाटील, विजय थोरवत, आर. एस. चौगुला, आप्पासाहेब हेगडे, प्रकाश देशपांडे, एस. एन. जाबण्णावर, संतोष नेसरी, शितल चोरगे, विक्रम करनिंग, जी. एस. इंडी, एस. पी. माने आदी सहभागी झाले आहेत. (प्रतिनिधी)
संकेश्वरात वकिलांचा कामकाजावर बहिष्कार
By admin | Published: November 04, 2016 12:11 AM