लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : लॉकडाऊन काळातील वीजबिलांना स्थगिती देऊन ऑक्टाेबरपासून पुढील बिले भरण्यास तयार आहोत, ही आमची भूमिका पहिल्यापासून आहे. मात्र, महावितरणने जिल्ह्यात घरगुती वीजकनेक्शन तोडण्याचा सपाटा लावला आहे. गावातील दक्षता समित्यांनी सज्ज होऊन कनेक्शन तोडण्यास येणाऱ्यांना कोल्हापुरी हिसका दाखवा, असे आवाहन इरिगेशन फेडरेशनचे जिल्हाध्यक्ष विक्रांत पाटील-किणीकर यांनी केले. २८ फेब्रुवारीपर्यंत निर्णय घेतला नाहीतर टोकाची भूमिका घेऊ, असा इशाराही त्यांनी दिला.
घरगुती वीज बिलांबाबत बुधवारी आयोजित केलेल्या बैठकीत ते बोलत होते. जिल्हा परिषदेचे माजी सदस्य बाबासाहेब देवकर म्हणाले, ज्येष्ठ नेते प्रा. एन. डी. पाटील यांच्या विचाराने हे आंदोलन सुरू आहे. लॉकडाऊन काळातील सहा महिन्यांचे बिल माफ करून ऑक्टाेबरपासून पुढील बिले द्यावी, ती भरण्यास आपण तयार आहोत. जनभावना लक्षात घेऊन वीजमाफीची भूमिका घ्यावीच लागेल. सरकारी कर्मचाऱ्यांचे पगारापोटी ७० हजार कोटींचे कर्ज काढले जाते, मग सामान्य माणसांसाठी ५ हजार कोटी देता येत नाही का? सरकारने आता अंत पाहू नये, असा इशारा देवकर यांनी दिला.
सरकारला २८ फेब्रुवारीपर्यंतची वेळ देऊ, तोपर्यंत वीज बिलमाफीचा निर्णय घेतला नाही तर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एकदिवसीय लाक्षणिक उपोषण करण्याचा इशारा विक्रांत पाटील यांनी दिला. शरद पाटील (ढवळी), संभाजीराव जगदाळे, मानसिंगराव भोसले, कुमार जाधव, एस. ए. कुलकर्णी, चंद्रकांत पाटील, आर. के. पाटील आदी उपस्थित होते.
‘महावितरण’वरच गुन्हे दाखल करा
वीज कनेक्शन तोडण्यापूर्वी ग्राहकांना लेखी नोटीस पाठविणे कायद्याने बंधनकारक आहे तसे न करता मोबाईलवर संदेशाचा आधार घेऊन कारवाई करत आहे. आता ‘महावितरण’वरच गुन्हे दाखल करा, अशी मागणी महादेव धनवडे यांनी केली.
राज्य, केंद्र सरकारकडून शेतकऱ्यांची टिंगल
कृषी कायदे रद्द करावे, म्हणून काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना केंद्र सरकारच्या विरोधात तर शेतीपंपांची वीज बिले माफ करावीत म्हणून भाजप राज्य सरकारच्या विरोधात आंदोलन करत आहे. या दोन्ही सरकारनी शेतकऱ्यांची टिंगल सुरू केल्याचा आरोप महादेव धनवडे यांनी केला.