आॅनलाईन लोकमत
कोल्हापूर , दि. 0६ : ज् शेतकरी आत्महत्येची चेष्टा करणाऱ्या सरकारला जाग आणण्यासाठी आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या अस्थिकलश दर्शनयात्रा घेऊन मंत्रालयावर धडक मारण्यासाठी साखराळे (जि. सांगली) येथील शेतकरी संघटनेचे विजय जाधव शनिवारी कोल्हापुरातून रवाना झाले.
या यात्रेची दखल सरकारने घेतली नाही तर महाराष्ट्रातील ‘भोगी सरकार’ विरोधात उत्तर प्रदेशच्या ‘योगी सरकार’कडे दाद मागण्यासाठी तिथेपर्यंत यात्रा करण्याचा निर्धार जाधव यांनी केला आहे. कोडोली (ता. पन्हाळा ) येथील शेतकरी विलास शितापे यांच्या अस्थी घेऊन यात्रेला शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथदादा पाटील यांच्या हस्ते सुरुवात केली.
सांगलीहून जिथे-जिथे शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेल्या आहेत, त्या ठिकाणच्या स्मशानभूमीत जाऊन तेथील रक्षा घेऊन मंत्रालयापर्यंत विजय जाधव धडक देणार आहेत. यात्रा पूर्ण होईपर्यंत सरकारने कर्जमाफीचा निर्णय घेतला नाही, तर महाराष्ट्रातील भाजपचे भोगी सरकारचा थेट उत्तर प्रदेशमध्ये जाऊन योगी सरकारसमोर वाभाडे काढणार असल्याचे जाधव यांनी सांगितले. यावेळी जिल्हाध्यक्ष पी. जी. पाटील, अॅड. माणिक शिंदे, अॅड. अजित पाटील, दादूमामा कामिरे, गुणाजी शेलार आदी उपस्थित होते.
अंत्ययात्रेनंतर आता अस्थिकलश
विजय जाधव यांनी दोन महिन्यांपूर्वी शेतकऱ्यांची प्रतीकात्मक अंत्ययात्रा मंत्रालयापर्यंत काढली होती. त्यानंतर आता रणरणत्या उन्हात अनवाणी पायाने दुचाकीवरून अस्थिकलश यात्रा सुरू केली आहे. दबाव आणाल तर याद राखा अस्थिकलश यात्रा निघू नये, यासाठी पोलिसांचा मोठा दबाव आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबावर आहे. शेतकऱ्यांचे प्रश्न मार्गी लावले तर आम्हाला आंदोलन करण्याची हौस नाही, तरीही अस्थिकलश यात्रा होऊ नये म्हणून कोणी दबाव आणत असेल तर याद राखा, गाठ शेतकऱ्यांशी आहे, अशा शब्दांंत जाधव यांनी पोलिस यंत्रणेला इशारा दिला.