कोल्हापूर: चीन (हँगजाऊ) येथे सुरु असलेल्या आशियाई स्पर्धेत रोलर स्केटींग ३००० मीटर रिलेत मुळच्या कोल्हापूरच्या पण सध्या पुण्यात स्थायिक झालेल्या विक्रम इंगळे याने सिद्धांत कांबळे (पुणे), अंनत कुमार (कर्नाटक) यांच्या साथीने कांस्य पदकाला गवसणी घातली. विक्रम सहा वर्षांच्या असल्यापासून त्याची स्केटींगमधील जडणघडण कोल्हापूरातील शिक्षण महर्षी बापूजी साळुंखे स्केटींग प्रशिक्षण केंद्रात झाली आहे.विक्रम सध्या कुटूंबासह पुण्यात स्थायिक झाला आहे. पण त्याची स्केटींगमधील श्री गणेशा कोल्हापूरात झाला. तो अगदी सहा वर्षाचा असताना त्याचे वडील राजेंद्र यांनी त्याला विवेकानंद काॅलेज परिसरातील शिक्षण महर्षी डॉ. बापूजी साळुंखे स्केटिंग प्रशिक्षण केंद्रात दाखल केले. आंतरराष्ट्रीय स्केटिंग प्रशिक्षक.प्रा. डॉ.महेश कदम यांच्या मार्गदर्शनाखाली त्याने येथील सरावास सुरुवात केली. त्याने राज्य, राष्ट्रीय स्केटींग स्पर्धेत चमकदार कामगिरी केली होती. राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्पर्धात चमकदार कामगिरी करण्यासाठी आंतरराष्ट्रीय दर्जाची स्केटींग रिंग कोल्हापूरात आवश्यक होती. ही बाब जाणून वडील राजेंद्र व आई ज्योती इंगळे यांनी सर्व कुटूंबासह पुण्यात स्थायिक होण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय सोमवारी विक्रमने कांस्य पदक पटकावून सार्थ ठरविला.विक्रमच्या या यशाबद्दल राष्ट्रीय संघटनेचे अध्यक्ष तुळशी कुमार, सचिव नरेश शर्मा, महाराष्ट्र राज्य संघटनेचे अध्यक्ष पी.के.सिंग, सचिव राजेंद्र जोशी, सहसचिव डी. एस .बुलंगे यांनी त्याचे विशेष कौतुक केले आहे.
आशियाई स्पर्धेतील कांस्य विजेत्या विक्रम इंगळेची जडणघडण कोल्हापुरात
By सचिन भोसले | Published: October 02, 2023 3:33 PM