विश्वास पाटीलकोल्हापूर : महाराष्ट्रात सध्या राज्यसभेच्या निवडणुकीची जोरदार चर्चा असून मतांची गणिते मांडली जात आहेत. राज्यसभेसारखीच मतदानाची पध्दत असलेल्या विधानपरिषदेच्या निवडणुकीत १९९६ ला विलासराव देशमुख शिवसेना पुरस्कृत उमेदवार म्हणून केवळ अर्ध्या मताने पराभूत झाले होते. त्याच्या आठवणी यानिमित्ताने जाग्या झाल्या.या निवडणुका रिप्रेझेंटेशन ऑफ पीपल ॲक्ट १९५१ व कॉन्डक्ट ऑफ इलेक्शन रूल १९६१ च्या नियमान्वये घेतल्या जातात. राज्यसभेच्या निवडणुकीत मतांचा कोटा व पसंतीक्रम निश्चित करून दिला जातो. पहिल्या पसंतीच्या मतांचा कोटा पूर्ण झाल्यावर उमेदवार विजयी घोषित केला जातो. परंतु तेवढी मते न मिळाल्यास सर्वच उमेदवारांची दुसऱ्या, तिसऱ्या, चौथ्या पसंतीची मते मोजली जातात.चौथ्या पसंतीची मते मोजण्याची वेळ यापूर्वी एकदाच विलासराव देशमुख उमेदवार असलेल्या विधानपरिषदेच्या निवडणुकीत आली होती व त्या लढतीत विलासराव अवघ्या अर्ध्या मताने पराभूत झाले होते, अशी आठवण माजी प्रधान सचिव अनंत कळसे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितली.घडले होते ते असे : विलासराव यांच्यासारख्या मातब्बर नेतृत्वाचा विधानसभेच्या १९९५ च्या निवडणुकीत लातूर मतदार संघातून शिवाजीराव कव्हेकर यांनी पराभव केला. त्यानंतर विधानपरिषदेची निवडणूक जाहीर झाली. काँग्रेसने जे विधानसभेला पराभूत झाले, त्यांना विधानपरिषदेला संधी नाही, अशी भूमिका घेतली. परंतु शरद पवार यांनी मात्र छगन भुजबळ यांचे नाव या उमेदवारीसाठी रेटले.म्हणून देशमुख यांनी बंडखोरी केली. (कव्हेकर यांना निवडून आणण्यात पवार यांचाच हात होता, असे देशमुख यांना वाटत होते. म्हणूनच ११ अपक्ष आमदार त्यावेळी त्यांनी शिवसेनेकडे पाठवून दिले होते. त्यातून राज्यात शिवसेनेचे सरकार आले.) त्यांना शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेत येण्याची ऑफर दिली. परंतु माझ्या रक्तातील काँग्रेस तुम्ही कशी काढणार? असे देशमुख यांचे विधान त्यावेळी गाजले होते. त्यांनी शिवसेनेचे सहयोगी उमेदवार म्हणून ही निवडणूक लढवली व त्यात अमरावतीच्या राठोड यांच्याकडून त्यांचा पराभव झाला.
पराभवामुळे झालो मुख्यमंत्री...पुढे विधानसभेच्या १९९९ च्या निवडणुकीत विलासराव महाराष्ट्रात सर्वाधिक मतांनी विजयी झाले आणि १८ ऑक्टोबर १९९९ ला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बनले. त्यादिवशी त्यांनी अनंत कळसे यांना जाऊन मिठी मारली व म्हणाले, ‘कळसे, तुम्ही काटेकोर मतमोजणी केल्यामुळे माझा अर्ध्या मताने पराभव झाला. निवडून आलो असतो, तर शिवसेनेचा आमदार म्हणून वावरलो असतो. पराभव झाल्यानेच मी परत काँग्रेसमध्ये सक्रिय झालाे व आज महाराष्ट्राचा मुख्यमंत्री बनलो.’