कोरोना कालावधीतील थकीत वीज बिल वसुलीची मोहीम महावितरणकडून गेल्या चार दिवसांपासून जोरदारपणे सुरू आहे. स्थानिक कर्मचारी व कार्यालयाकडून पाठविण्यात आलेल्या आठ-दहा कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून ही वसुली सुरू आहे. कोणत्याही प्रकारची सूचना किंवा निरोप न देता हे कर्मचारी ग्राहकांच्या दारात जाऊन मोठ्याने बोलत, ओरडत बिलाची मागणी करतात. दिवसभर सर्वच घरांत महिलाच उपस्थित असतात. त्यामुळे घरी कोणी नाही, नंतर भरण्यास पाठवितो, असे सांगितले जाते. सक्तीने सुरू असणारी वसुली थांबवावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली. तसेच काही कर्मचारी तर चक्क मद्यपान करून वसुलीसाठी आलेले असतात, अशी माहिती कर्मचाऱ्याच्या नावासह सांगितली. महावितरण कर्मचाऱ्यांचा हा प्रताप ऐकून सहायक अभियंता मंगसुळे यावेळी निरुत्तर होऊन अचंबित झाले. दरम्यान, ग्रामस्थांच्या मागणीकडे दुर्लक्ष करून त्यांची दखल घेतली नाही, त्यामुळे ग्रामस्थांनी गाव बंद करीत बसस्थानकावर रास्ता रोको केला.
फोटो ओळी -
महावितरणच्या कर्मचाऱ्यांकडून उद्धटपणाचे वर्तन करीत जबरदस्तीने करण्यात येत असलेल्या वीज बिल वसुलीच्या निषेधार्थ यळगूड येथे आज गाव बंद व रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.