देवाळे : नियमित तपासणी / सर्व्हे, अलगीकरण, कोरोना रुग्णांच्या संपर्कातील व्यक्तींचा शोध (काॅन्टॅक्ट ट्रेसिंग) प्राथमिक अवस्थेत निदान (अर्धी स्टेज डिटेक्शन), सुपर ट्रेड टेस्टस, हाय रिस्क काॅन्टॅक्टस ट्रेसिंग याबाबत ग्राम समिती आणि आरोग्य विभाग यांनी दक्षता घेणे गरजेचे आहे. तसे केल्यास कोरोनाच्या संसर्गावर नियंत्रण ठेवणे शक्य असल्याचे पन्हाळ्याचे उपविभागीय अधिकारी अमित माळी यांनी सांगितले. मसूदमाले येथे कोरोना व्यवस्थापन समिती आढावा बैठकीत त्यांनी मार्गदर्शन केले.
पहिल्या लाटेवेळी शेवटपर्यंत कोरोनाला वेशीबाहेर रोखण्यात यशस्वी ठरलेल्या गावातील कोरोना रुग्णसंख्या 46 वर पोहोचली असून दोन मृत्यू झाले आहेत. १३ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. त्यामुळे ही संख्या वाढू नये यासाठी ग्रामपंचायत सभागृहात उपविभागीय अधिकारी, पन्हाळ्याचे तहसीलदार रमेश शेंडगे, गटविकास अधिकारी यांच्या उपस्थितीत कोरोना समितीच्या आढावा बैठकीत मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी गावातील १८३७ पात्र नागरिकांपैकी ११४३ जणांना लसीचा पहिल्या डोसाचा लाभ देण्यात आला आहे; तर ४७१ नागरिकांना दुसरा डोस पूर्ण झाल्याचे सांगण्यात आले.
यावेळी सरपंच भारती पाटील, उपसरपंच उत्तम पाटील, आबाजी पाटील, कृषी अधिकारी मेश्राम, मंडल अधिकारी अभिजित पवार, पर्यवेक्षक तारळे, आरोग्यसेविका शितोळे, आरोग्यसेवक पवार, तलाठी गणेश गवळी, ग्रामसेवक विलास पाटील, कोतवाल संभाजी पाटील यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य व सेवकवर्ग उपस्थित होते.