चाफळ : पाटण तालुक्यातील माजगांव व चाफळ ही दोन्ही गावे शांत आणी समृध्द. दोन्ही गावांना ऐतिहासिक व राजकिय वारसा लाभलेला; पण सध्या याच दोन्ही गावातील युवकांमध्ये दुही निर्माण झाली आहे. येथील ग्रामस्थांमध्ये असणारा एकोपा कमी झाला आहे. युवकांमध्ये वारंवार या ना त्या कारणाने वादावादीचे प्रकार घडत असल्याने या गावांचे गावपणच हरवुन गेल्याचे दिसुन येत आहे.माजगाव व चाफळ ही दोन गावे तालुक्यात संवेदनशिल म्हणुन ओळखली जातात. या दोन्ही गावांचा इतीहास वेगळा आहे. सुसंस्कत व सुविचारी गावे म्हणुन या गावांकडे विभागातिल जनता नेहमीच पाहते. एखादा अडला, नडला तर येथील ग्रामस्थ त्याला मदतीचा हात देतात. मात्र, सध्या या दोन्ही गावातील तरूण एकमेकांच्या विरोधात उभे ठाकले आहेत. राजकारणाच्या वेडात येथील तरूण आपल्याच पायावर दगड मारत एकमेकांची डोकी फोडण्याचे प्रकार करीत आहेत. दोन्ही गावातील तरूण नेहमिच किरकोळ कारणावरून हाणामारी करताना दिसतात. याचा त्रास ग्रामस्थांबरोबर महिलांनाही सहन करावा लागत आहे. एखाद्या ठिकाणी किरकोळ वादावादी झाल्यास त्याला लगेचच राजकारणाची झालर लावली जाते. त्यातुनच ही किरकोळ वादावादी गंभीर रूप धारण करते. राजकारणी मंडळी प्रतिष्ठेचा विषय बनवुन आगित तेल ओतण्याचा प्रकार करताना दिसुन येतात. या सर्व प्रकारांमुळे पुर्वीचे या गावांचे गावपण हरवुन गेले आहे. या तरूणांच्या हाती आता लाकडी दांडकी व शस्त्रे दिसु लागली आहेत. काही दिवसांपुर्वी चाफळच्या महाविद्यालय परिसरात किरकोळ कारणावरून घडलेल्या प्रकारामुळे माजगांव व चाफळच्या युवकांमध्ये जोरदार राडा झाला होता. हे होतेय न होतेय तोपर्यंत पुन्हा माजगावच्या एका तरूणाने उंब्रजमध्ये चाफळच्या युवकाला मारहाण केल्याने तणाव निर्माण झाला होता. पोलिसांनी हस्तक्षेप केल्याने हे प्रकरण तेथेच मिटले. त्यानंतर गत आठ दिवसांपुर्वी चाफळच्या एका तरूणाने माजगावमध्ये जावुन तेथील तरूणाच्या कानशिलात लगावल्याने पुन्हा चाफळ व माजगांव या गावांमध्ये दुफळी निर्माण झाली. हे सर्व प्रकार भरवस्तीत गजबजलेल्या ठिकाणी दिवसाढवळ्या घडत असताना सर्वजण बघ्याची भुमिका घेत होते. विधानसभा निवडणुक काळातही एका युवकाकडे वाघजाईवाडी गावाजवळ धारदार शस्त्र आढळुन आले होते. मात्र, स्थानिक लोकप्रतिनिधींमुळे ते प्रकरण तिथेच मिटवले गेले. राजकिय दबावामुळे मारामारी करणाऱ्या युवकांवर कारवाई होत नाही. त्यामुळे युवकांवर कोणाचाही वचक राहिलेला नाही. (प्रतिनिधी)ज्येष्ठ ग्रामस्थांनी पुढाकार घेणे गरजेचेयुवकांमध्ये होत असलेल्या वादावादीच्या घटनांना चाप लावले गरजेचे आहे. त्यासाठी युवकांना मार्गदर्शन होणे व या वादावादीचे दुष्परीणाम त्यांना समजावून सांगणे गरजेचे आहे. दोन्ही गावातील ज्येष्ठ ग्रामस्थांनी त्यासाठी पुढाकार घ्यावा. ज्येष्ठ ग्रामस्थांनी पुढाकार घेऊन युवकांची समजूत घातल्यास हे प्रकार लवकर थांबतील. तसेच या दोन्ही गावांमध्ये पुर्वीप्रमाणे एकोपा निर्माण होईल.
गाव तसं चांगलं; पण राजकारणाने टांगलं!
By admin | Published: April 27, 2015 9:49 PM