एकनाथ पाटील -- कोल्हापूर परिक्षेत्रातील पाच जिल्ह्यांत युवती व महिलांसाठी भयमुक्त वातावरण झाले पाहिजे. त्या स्वत: धाडसाने एखाद्या छेडछाडीच्या प्रसंगाला अटकाव करू शकतील. त्यासाठी दोन महिला कॉन्स्टेबलना एक गाव दत्तक दिले जाणार आहे. त्या गावातील महिलांना एकवटून, त्यांचे पथक तयार करून त्यांचे मनोधैर्य वाढविण्याचा प्रयत्न महिला कॉन्स्टेबल करतील. जेणेकरून हे महिला पथक गावातील तरुणांत एकात्मिकतेची भावना निर्माण करून पानटपरीमध्ये मिळणारा गुटखा, मटका, अवैध दारू हद्दपार करील. सोमवार (दि. ८)पासून या ‘सी’ स्क्वाड मोहिमेला सुुरुवात केली जाणार असल्याची माहिती विशेष पोलिस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. शहरासह ग्रामीण भागांतील महाविद्यालयांसह बसस्टॉपवर युवती व महिलांच्या छेडछाडीचे प्रकार दिवसेंदिवस वाढत आहेत. त्या प्रकारामुळे शैक्षणिक व सामाजिक पावित्र्य नष्ट होत चालले आहे. अहमदनगर-कोपर्डी येथे युवतीवर झालेल्या बलात्काराचे पडसाद राज्यभर उमटले. याची पुनरावृत्ती कोल्हापूर परिक्षेत्रात होऊ नये, यासाठी विशेष पोलिस महानिरीक्षक नांगरे-पाटील यांनी युवती व महिलांच्या सुरक्षेला प्राधान्य दिले आहे. औरंगाबाद येथे त्यांनी राबविलेली ‘सी’ स्क्वाड मोहीम यशस्वी झाली. हीच मोहीम त्यांनी कोल्हापूर परिक्षेत्रातील कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे ग्रामीण व सोलापूर ग्रामीणमध्ये राबविण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी त्यांनी परिक्षेत्रातील दहा महिला अधिकाऱ्यांच्या ‘सी’ स्क्वाडची नियुक्ती करून त्यांना हैदराबाद येथे प्रशिक्षणासाठी पाठविले होते. त्यांना युवतींच्या सुरक्षेसंबंधी आयपीएस अधिकारी महेश भागवत व अप्पर पोलिस अधीक्षक स्वाती लाकरा यांनी मार्गदर्शन केले. हे पथक सक्रिय होऊन परतले आहे. हे पथक परिक्षेत्रातील सहभागी महिला पोलिस अधिकारी व कॉन्स्टेबलना सोमवारी मार्गदर्शन करणार आहे. ‘युवती व महिला सुरक्षा आॅपरेशन’ कसे राबवायचे त्याच्या प्रात्यक्षिकांची व्हिडीओ चित्रफीत दाखविण्यात येणार आहे. युवती व महिलांची छेड गावापासूनच सुरू होते. एक स्त्री कोणाची तरी आई, बहीण, पत्नी असते. त्यामुळे आजूबाजूला राहणाऱ्या युवकांमध्ये एकात्मिकतेची भावना निर्माण व्हावी, गावातील अन्यायाविरोधात आवाज उठविण्यासाठी युवती व महिला पुढे याव्यात; यासाठी दोन महिला कॉन्स्टेबलमागे एक गाव दत्तक दिले जाणार आहे. या महिला पोलिस गावात जाऊन युवती-महिलांशी संवाद साधतील. साधारणत: २० महिलांचे पथक तयार करून त्यांच्यामध्ये मनोधैर्य वाढविण्यासाठी महिला कॉन्स्टेबल प्रयत्न करतील. अवैध धंद्यांबरोबरच छेडछाड व बलात्काराच्या घटनांना हद्दपार करील, असा या मोहिमेचा उद्देश असल्याचे नांगरे-पाटील यांनी सांगितले. पोलिसांच्या सतर्कतेची परीक्षा कोल्हापूर परिक्षेत्रात १४६ पोलिस ठाणी आहेत. या प्रत्येक पोलिस ठाण्याच्या हद्दीमध्ये पथकातील दोन महिला कॉन्स्टेबल साध्या वेशात कॉलेज युवतीच्या भूमिकेत जातील. त्या एखाद्या कॉलेज कॅम्पससमोर उभ्या राहून नियंत्रण कक्ष किंवा हद्दीतील पोलिस ठाण्यात फोन करतील, ‘छेडछाड होत आहे, कारवाई करा.’ त्यानंतर किती वेळात त्या ठिकाणी पोलिस येतात, आल्यानंतर ते कोणाकडे विचारपूस करतात, हे पाहतील. आलेल्या पोलिसांची नावे त्या रेकॉर्ड वहीमध्ये नोंद करतील. त्यानंतर हा अहवाल नांगरे-पाटील यांना सादर करतील. पोलिसांची सतर्कता पाहण्यासाठी हे अभियान राबविण्यात येत आहे. पत्नीसमोर समज अलीकडे तरुणांपेक्षा विवाहित व्यक्ती कार्यालयातील, शेजारी राहणाऱ्या महिलांची छेड काढत असल्याच्या तक्रारी आहेत. परिक्षेत्रातील एका शहरातील चाळीस वर्षीय व्यक्ती आपल्या मागे लागली असून, ती नेहमी छेड काढत असल्याची तक्रार पीडित महिलेने विशेष पोलिस महानिरीक्षक कार्यालयाकडे केली आहे. या घटनेमुळे विवाहित व्यक्तींच्या विरोधात छेडछाडीच्या तक्रारी आल्यानंतर संबंधित व्यक्तीला त्याच्या पत्नीसमोर उभे करून समज दिली जाणार आहे. जेणेकरून अशा घटनांना आळा बसेल, असे नांगरे-पाटील यांनी सांगितले. छेडछाड करणाऱ्या तरुणांच्या घरी पोलिस महाविद्यालय, बसस्टॉप परिसरांत युवतींची छेड काढणाऱ्या तरुणांविरोधात तक्रारी दाखल होताच पोलिस त्यांच्या घरी जातील. त्यांच्या आई-वडिलांसमोरच त्यांना कायदेशीर समज दिली जाणार आहे.
दोन महिला पोलिसांकडे एक गाव
By admin | Published: August 06, 2016 12:05 AM