या ग्रामसुरक्षा यंत्रणेमध्ये एक विशिष्ट टोल फ्री क्रमांक असून याची कळ दाबताच पंचवीस सेकंदांमध्ये बाधितांस परिस्थिती हाताळण्यासाठी मार्गदर्शन उपलब्ध होते. या यंत्रणेमध्ये फक्त पूरपरिस्थिती, चोरी, रस्ते अपघात, महिला छेडछाड, दंगल, रेशनविषयक, ग्रामसभा, सरकारी योजनांची माहिती, लहान मुले पळवून नेणे, हिंस्र प्राण्यांचे हल्ले या घटना घडल्यास एका कळीवर हजारो नागरिकांपर्यंत हा मेसेज जातो व त्या पीडित नागरिकाला मदत मिळते. पण त्याचबरोबर खोटी बातमी, वैयक्तिक संदेश, दशक्रिया, वर्षश्राद्ध, वाढदिवस शुभेच्छा, धार्मिक किंवा जातीय तणाव निर्माण करणारे संदेश, सामाजिक शांतता धोक्यात आणणारे संदेश ग्राम सुरक्षा यंत्रणा स्वीकारत नाही. या यंत्रणेमध्ये गावातील कोणताही नागरिक सहभागी होऊ शकतो. या सुरक्षा प्रणालीच्या माध्यमातून एकाच वेळी सर्व ग्रामस्थ, पोलीस प्रशासन, आरोग्य विभाग या सर्व विभागाशी एकाच वेळी संपर्क होऊन २५ सेकंदांत कोणत्याही घटनेची माहिती वा सूचना देण्यात येते. याद्वारे सर्व संबंधित यंत्रणांना क्षणार्धात घटनेची माहिती मिळते व परिस्थिती हाताळण्यासाठी सर्वांना मार्गदर्शन करण्याची व्यवस्था होते. हा अभिनव उपक्रम जिल्हात प्रथमच माणगाव ग्रामपंचायतीने सुरू केला असून, विशेष महणजे आपल्या भ्रमणध्वनीमध्ये पुरेशी शिल्लक संदेशवहन क्षमता नसली तरीही नागरिकांना या यंत्रणेचा वापर करता येतो.
माणगाव ग्रामपंचायतीकडून ग्राम सुरक्षा यंत्रणा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2021 4:22 AM