शिक्षकाने मनात आणलं, तर विद्यार्थ्यांसाठी काय करू शकतो याचे आदर्श उदाहरण म्हणजे आजरा तालुक्यातील बाची विद्यामंदिर शाळा होय. बाची विद्यामंदिर शाळेत १८ मुले आहेत. ही शाळा इयत्ता पहिली ते चौथीपर्यंत आहे. दोन शिक्षिका म्हणजे ही द्विशिक्षकी शाळा. मात्र, शिक्षिका अत्यंत मनापासून, पेशाची बांधीलकी मानून, विद्यार्थी हा केंद्रबिंदू ठेवून केवळ अध्यापन नव्हे, तर शाळा परिसर व मुले-मुली यांच्या सर्वांगीण विकासासाठी झटत आहेत. प्राथमिक शिक्षणाचे सार्वत्रिकीकरण हे शासनाचे शिक्षण धोरण आहे. त्या धोरणास अनुसरून कोल्हापूर जिल्हा परिषदेचा प्राथमिक शिक्षक विभाग कार्यतत्पर आहे. त्याचे उदाहरण म्हणजे आजरा तालुक्यातील बाची गावची विद्यामंदिर शाळा. तालुक्यात १२१ प्राथमिक शाळा आहेत. या तालुक्यात आणि तालुकास्तरीय शैक्षणिक गुणवत्ता मूल्यांकन होऊन या शाळेचा गुणवत्तेत तिसरा क्रमांक आलेला आहे. शाळेचा परिसर स्वच्छ व सुंदर असून शाळेच्या दर्शनाने मन प्रसन्न होऊन जाते. अत्यंत नेटकेपणाने शाळेसमोरची बाग फुलविली आहे. पाणी वाया जाणार नाही, पण झाडं जगतील याची दक्षता घेतली आहे. ती स्प्रिंकल पद्धतीचा वापर करून. नयनमनोहर हिरवाई व कल्पकता यामुळे सन २०१४-१५ मध्ये प्राथमिक शिक्षक बॅँकेकडून ‘स्वच्छ, सुंदर, हिरवी शाळा’ पुरस्कार मिळाला आहे. बाची गावची लोकसंख्या फक्त ४२८ इतकीच. गाव छोटे, पण लोक सहभाग मोठा. माझी शाळा समृद्ध व गुणवत्तेची व्हायला हवी, हाच गावकरी, शाळा व्यवस्थापन समिती, पालक व माता यांची जिद्द व मनापासूनची तळमळ आहे. त्यांच्या बोलण्यातून हे प्रकर्षाने जाणवले. शाळेसाठी शैक्षणिक उठाव २०,००० रु. इतका व त्यातून माईक सिस्टीम, ‘गंमत-जंमत’ वर्ग, पहिलीसाठी विविध बोर्ड तयार केले. खरे तर थक्क करणारे योगदान हे त्या शाळेतील माजी विद्यार्थ्यांचे. ही शाळा म्हणूनच आम्ही पुढे शिकलो व नोकरी व्यवसायात शिरलो याची जाण व भान त्यांच्या बोलण्यातून जाणवली. हेच खरे शिक्षण संस्कार जे बाची विद्यामंदिरने शिदोरी म्हणून दिलेले. त्यामुळे माजी विद्यार्थी सक्रिय आहेत. शैक्षणिक गुणवत्ता व भौतिक सुविधा देण्यातून कारण शिक्षिकांचे कामही वाखणण्यासारखेच.सन २०१४-१५ मध्ये शैक्षणिक गुणवत्ता विकास कार्यक्रमांतर्गत जिल्हा परिषदेकडून उपक्रमशील शाळा म्हणून संगणक बक्षीस मिळाला. शाळा पाहताक्षणीच मनात भरणारी, पर्यावरण राखलेली, रंगरंगोटी व स्वच्छता असलेली. हिरवाईसुद्धा जपलेली. बोलके व्हरांडे आहेतच. आॅक्सिजन पार्क आणि गांडूळ खत प्रकल्प हे पाहून खरोखरच खूप थक्क व्हायला झाले. लहान शाळा. पट फक्त १८. पण, कामगिरी मात्र गुणवत्तेची. जिद्द, बांधीलकी, विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा सर्वांगीण विकास करण्याचे ध्येय बाळगून ही शाळा व शिक्षिकेंची वाटचाल आदर्शवत म्हणावी लागेल. एक विद्यार्थी शिष्यवृत्तीधारक. शाळेच्या इतिहासात प्रथम. या शाळेचा परिसर मोठा. विद्यार्थी कमी, पण शाळेची स्वच्छता उत्कृष्ट. खासगी शाळेपेक्षा ही जिल्हा परिषदेची शाळा वेगळी, वरचढ व वैशिष्ट्यपूर्ण. तीही लहान गाव, दुर्गम भाग असूनसुद्धा.‘माझी शाळा’ म्हणून धावणारे ग्रामस्थ, शिस्त व संस्कारास प्रतिसाद देणारे विद्यार्थी, भारावून टाकणारे वातावरण, जिल्हा मूल्यांकन समितीच्या निमित्ताने शिक्षणाधिकारी मा. स्मिता गौडे यांच्यासह ही भेट म्हणजे शिक्षणातील गुणवत्तेची खात्री देणारी शाळा होय.- डॉ. लीला पाटीलशाळेची वैशिष्ट्येयंदाचा खास उपक्रम (सेव्ह द बर्डस्) शाळेच्या बागेत, प्रांगणात पक्ष्यांना विविध घरटी. अन्न, पाणी उपलब्ध करून दिले आहे. बचत बॅँक, निबंध, वक्तृत्व, कथाकथन, रांगोळी, विविध पाठांतर हे उपक्रम आहेत. मुलींसाठी खास वेशभूषा करून सावित्रीबाई फुले, झाशीची राणी, इंदिरा गांधी, मदर तेरेसा, आदी भूमिका केल्या आहेत. वनभोजन, सहल, रात्र अभ्यासिका, क्षेत्रभेट, लेझीम, कवायत मनोरे, योगासने, वृक्षारोपण, वाचन उपक्रम, आदर्श माता पालक व विद्यार्थी गुणगौरव, आदी विविध उपक्रम राबविले जातात. माजी विद्यार्थी, बाची गावचे ग्रामस्थ, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष व सर्व सदस्य या सर्वांचा शैक्षणिक गुणवत्ता उंचाविण्यात मोलाचा वाटा आहे.आवार सफाई असो, कुंपण करणे, शाळा शेकारणे असो वा रंगकाम असो, ग्रामस्थ, पालकांचे सर्व गोष्टींत मोलाचे व अतिउत्कृष्ट सहकार्य आहे.शाळेच्या बाह्यांगाबरोबर अंतरंगही चांगले हवे तरच मुलं रमतात, म्हणून शिक्षिकेंनी शाळेची रंगरंगोटी करण्यात पुढाकार घेतला. अगदी मनात भरणारे, शैक्षणिक मूल्य असलेली बाब म्हणजे गंमत-जंमत असा पहिलीचा वर्ग साकारला आहे. या वर्गामध्ये जास्तीत जास्त मुलांसमोर इंग्रजी ठेवले, ती काळाची गरज म्हणून. शाळेत मुलींसाठी नवीन स्वच्छताहगृह आहे.
बाची गाव छोटं पण...
By admin | Published: June 26, 2015 10:04 PM