कोल्हापूर : विविध मागण्यांसाठी राज्यातील ग्रामसेवकांचे आंदोलन सुरूच असून, गेले २२ दिवस काम बंद आंदोलनाने गावगाडा ठप्प झाला आहे. करवीर तालुक्यातील ग्रामसेवकांचे पंचायत समितीच्या दारात ठिय्या आंदोलन सुरू आहे.ग्रामसेवकांच्या वेतनत्रुटी दूर करणे, ग्रामसेवक व ग्रामविकास अधिकारी पद रद्द करून पंचायत विकास व अधिकारी पद निर्माण करावे, ग्रामसेवक पदाची शैक्षणिक अर्हता पदवीधर करणे, २००५ नंतर सेवेत रुजू झालेल्या ग्रामसेवकांस जुनी पेन्शन योजना लागू करावी, विस्तार अधिकारी पंचायत वाढीव पदे मंजूर करणे, आदी मागण्यांसाठी ग्रामसेवकांचे २२ आॅगस्टपासून बेमुदत काम बंद आंदोलन सुरू आहे.
त्यामुळे गावातील व्यवहारांवर परिणाम झाला असून, सरकारपातळीवर प्रश्नांबाबत अद्याप काहीच निर्णय झालेला नाही. करवीर तालुक्यातील ग्रामसेवक पंचायत समितीच्या दारात ठिय्या आंदोलन सुरू आहे.
दरम्यान, आंदोलनकर्त्यांना कॉँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार सतेज पाटील यांनी भेट देऊन मागण्यांना पाठिंबा दिला. यावेळी ग्रामसेवक संघटनेचे साताप्पा मोहिते, बाबासाहेब कापसे, आर. डी. कुंभार, काकासाहेब पाटील, अजित राणे, आर. एन. गाढवे, अभिजित चौगुले, शिवाजी वाडकर, दत्ता धनगर, आदी उपस्थित होते.