लोकमत न्यूज नेटवर्क
सरवडे : राधानगरी तालुक्यातील काही गावांना प्रांताधिकारी प्रसन्नजित प्रधान यांनी भेटी देऊन ग्रामदक्षता समितींना दक्ष राहण्याच्या सूचना दिल्या. ४५ वर्षावरील व्यापाऱ्यांनी लस घेऊन त्याचे प्रमाणपत्र जवळ ठेवणे बंधनकारक केले आहे. तालुक्यातील इतर गावांनाही भेटी देऊन त्यांनी कोरोना रुग्णांची माहिती घेतली.
राधानगरी तालुक्यात कोरोनाची रुग्णसंख्या वाढत आहे. काही गावांत लग्नसमारंभातून, तर काही गावांत ‘गोकुळ’च्या निवडणुकीच्या ठराव गोळा करण्यातून कोरोनाचा प्रसार वाढला आहे. संचारबंदीचे काटेकोरपणे पालन न केल्यास पुढील काही दिवसांत मोठ्या प्रमाणात कोरोनाचे रुग्ण वाढण्याची शक्यता आहे. अनेक गावांत पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. या संदर्भात प्रांताधिकारी प्रसन्नजित प्रधान यांनी तालुक्यातील गावांना भेटी दिल्या. नेमके कोरोना रुग्ण कशाने वाढले याची माहिती घेतली आणि ग्रामदक्षता समितींना दक्ष राहण्याच्या सूचना दिल्या. यावेळी मंडल अधिकारी शिवाजी कोळी, देवीदास कारडे, तलाठी, ग्रामसेवक सरपंच उपस्थित होते.