कोल्हापूर : पूरग्रस्तांना भरीव मदत मिळावी, नियमित पीक कर्ज भरणाऱ्यांना ५० हजारांचे प्रोत्साहनपर अनुदान तातडीने द्यावे, यासह विविध मागण्यांसाठी निघालेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदयात्रेला शुक्रवारीही चांगला प्रतिसाद मिळाला. या पदयात्रेमुळे पूरग्रस्तांच्या मदतीच्या आशा पल्लवित झाल्याचे पाहायला मिळाले. दरम्यान, पदयात्रेच्या तिसऱ्या दिवशी गावागावातील शेतकरी यात सहभागी झाले, त्यामुळे गर्दी झाली होती.
करवीर तालुक्यातील प्रयाग चिखलीपासून पदयात्रा बुधवारी निघाली. गुरूवारी हातकणंगले तालुक्यातील चोकाक येथे पदयात्रेचा मुक्काम होता. शुक्रवारी सकाळी तेथून पदयात्रेला सुरूवात झाली. अतिग्रे येथून रूकडी येथे पदयात्रा आल्यानंतर सभेत रूपांतर झाले. तेथे माजी खासदार राजू शेट्टी यांनी पूरग्रस्तांना मदत देण्यात होणाऱ्या दिरंगाईप्रश्नी केंद्र, राज्य सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडले. ते म्हणाले, पुरात शेती उद्ध्वस्त झाल्याने संबंधित शेतकऱ्यांची मोठी आर्थिक कोंडी होत आहे. यातूनच पूरग्रस्तांवरही आत्महत्तेची वेळ येत आहे. त्याला केंद्र आणि राज्य सरकार जबाबदार आहे. राष्ट्रीय आपत्ती निधी गुजरातला त्वरित मिळतो तर महाराष्ट्राला का मिळत नाही?
यावेळी जिल्हा परिषद सदस्य पद्माराणी पाटील, वंदना मगदूम, अशोक माने यांची प्रमुख उपस्थिती होती. ही सभा संपल्यानंतर पदयात्रा चिंचवाड येथे आली. तेथे पदयात्रेतील शेतकरी, कार्यकर्त्यांनी जेवण केले. तेथून दुपारी तीन वाजता पदयात्रा पुन्हा निघाली. गडमुडशिंगी, वसगडे येथून यात्रा पट्टणकोडोली येथे पोहोचली. तेथील बिरदेव मंदिरात यात्रेतील शेतकरी, कार्यकर्त्यांनी मुक्काम केला. ही पदयात्रा ५ सप्टेंबरला नृसिंहवाडी येथे पोहोचणार आहे. दरम्यानच्या काळात मागण्यांसंबंधी सकारात्मक निर्णय न झाल्यास हजारो कार्यकर्त्यांसमवेत शेट्टी हे जलसमाधी आंदोलन करणार आहेत.
या पदयात्रेत स्वाभिमानीचे प्रदेशाध्यक्ष जालंदर पाटील, वैभव कांबळे, स्वाभिमानीच्या युवती अध्यक्ष पूजा मोरे, मराठवाडा प्रमुख गजानन बंगाळे यांच्यासह राज्यातील पदाधिकारी सहभागी झाले होते.
चौकट
आर्थिक बळही
रूकडी, चिंचवाड येथे पदयात्रेचे जंगी स्वागत झाले. चिंचवाडच्या ग्रामस्थांनी पदयात्रेला मदत म्हणून ११ हजार ५५५ रूपयांची देणगी दिली. ग्रामस्थांनी खर्डा, भाकरी, दही, भात असा स्वयंपाक करून जेवू घातले.
चौकट
पदयात्रेचा आजचा मार्ग असा
पट्टणकोडोली, इंगळी, रूई, चंदूर, इचलकरंजी येथून पदयात्रा जाऊन अब्दुललाटला मुक्काम करणार आहे.
फोटो : ०३०९२०२१-कोल-पदयात्रा आणि पदयात्रा०१
माजी खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली स्वाभिमानी शेतकरी संघटनेने काढलेल्या पदयात्रेला शुक्रवारी सर्वच गावांमध्ये असा प्रतिसाद मिळाला.