गडहिंग्लज : मराठा समाजाला घटनात्मक आरक्षण मिळविण्यासाठी जिल्ह्यात गाववार बैठक घेवून जनजागृतीची मोहिम राबविणार आहे, अशी माहिती मराठा महासंघाचे प्रदेश उपाध्यक्ष वसंतराव मुळीक यांनी दिली.मराठा आरक्षणप्रश्नी आंदोलनाची दिशा ठरविण्यासाठी येथे गडहिंग्लज विभागीय आयोजित सकल मराठा समाजाच्या बैठकीत ते बोलत होते. अध्यक्षस्थानी अॅड. गुलाबराव घोरपडे होते. इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत यांची प्रमुख उपस्थिती होती. येथील नगरपालिकेच्या सभागृहात ही बैठक झाली.मुळीक म्हणाले, सर्वोच्च न्यायालयाने आरक्षणाला स्थगिती दिल्याने मराठा समाज पुन्हा अडचणीत सापडला आहे. त्यामुळे लाल महल ते लाल किल्ला अशा देशव्यापी आंदोलनाची गरज आहे. त्यासाठी छत्रपती शाहू महाराजांच्या नेतृत्वाखाली मराठा बांधवांनी वज्रमूठ बांधायला हवी.सावंत म्हणाले, ओबीसी अंतर्गतच स्वतंत्र प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण मिळायला हवे. त्यासाठी ओबीसीमध्ये स्वतंत्र प्रवर्गाची घटनात्मक तरतूद करण्याची गरज आहे. आरक्षण मिळेपर्यंत राज्य शासनाने मराठा समाजाला ओबीसींच्या सर्व सवलती द्याव्यात, असे बजावून सांगायला हवे. यावेळी गडहिंग्लज तालुका उपाध्यक्ष शिवाजीराव भुकेले, आजरा तालुकाध्यक्ष मारूती मोरे, सुनिल शिंत्रे यांचीही भाषणे झाली.बैठकीस विद्याधर गुरबे, दिग्विजय कुराडे, नागेश चौगुले, चंद्रकांत सावंत, किरण खोराटे, प्रकाश तेलवेकर, श्रद्धा शिंत्रे, अलका भोईटे, शिवणे गुरूजी आदींसह गडहिंग्लज, आजरा व चंदगड तालुक्यातील समाजाचे पदाधिकारी उपस्थित होते. गडहिंग्लज तालुकाध्यक्ष किरण कदम यांनी प्रास्ताविक केले. दिलीप माने यांनी आभार मानले.
त्यांच्याकडे लक्ष देवू नका..!राजकीय झुल पांघरून समाजाचे नेतृत्व करणाऱ्यांचे नेतृत्व समाज नाकारू शकतो. आपली राजकीय पोळी भाजून घेण्यासाठी मराठा आरक्षणासंदर्भात कोण काय बोलतो त्याकडे लक्ष देवू नका, असे आवाहनही इंद्रजीत सावंत यांनी केले.