सडोली खालसा : कोथळी (ता. करवीर) येथील महिलेच्या अंत्यसंस्कारामध्ये व्हाईट आर्मीसह ग्रामस्थांचाही सहभाग होता. पीपीई कीट वेळेत उपलब्ध न होणे व कोरोनाबद्दलच्या जनमाणसांतील भीतीमुळे अंत्यसंस्कारास विलंब झाल्याचे स्पष्टिकरण कोरोना दक्षता समितीच्या अध्यक्ष व सचिवांनी केले आहे.या महिलेचा कोरोना अहवाल निगेटिव्ह आला होता. आपला अहवाल निगेटिव्ह आला व पतीसह दोन मुले, सून व नातू पॉझिटिव्ह आल्यानेच त्यांना धक्का बसला व त्यातच त्यांचा मृत्यू झाला. त्या अस्वस्थ झाल्यावर पोलीस पाटील यांनी १०८ रुग्णवाहिकेला कळविले. त्यांनी येऊन तपासणी केल्यावर महिलेचा मृत्यू झाला होता. त्यांनी ही रुग्णवाहिका असल्याने मृतदेह गाडीत घेण्यास नकार दिला.
मृतदेहाजवळ कोणी जावू नये व प्रशासनाच्या सूचनेनुसारच अंत्यसंस्कार करावेत, अशा सूचना त्यांनी दिल्या. आरोग्य विभागाशी चर्चा केल्यावर त्यांनी त्या कोरोना निगेटिव्ह असल्याने स्थानिक पातळीवरच अंत्यसंस्कार करावेत, अशा सूचना केल्या. त्यासाठी पीपीई कीटची मागणी केली परंतु त्यास प्रतिसाद मिळाला नाही, अशी विविध कारणे विलंबास कारणीभूत ठरली आहेत. शेवटी व्हाईट आर्मीचे जवान व गावातील तरुण मंडळाच्या कार्यकर्त्यांनीच महिलेचा अंत्यविधी केला.