उखळू गावच्या सरपंचांनी सध्या कार्यरत असलेल्या कृष्णात माने या ग्रामसेवकाच्या बदलीची मागणी प्रशासनाकडे केली होती. मात्र यावर निर्णय होण्याआधीच सरपंचाने प्रशासनाला कोणतीही कल्पना न देता ग्रामसेवकाच्या केबिनला शुक्रवार (दि.२१) रोजी टाळे ठोकले होते. विस्तार अधिकाऱ्यांच्या मध्यस्थीनंतरसुद्धा यातून कोणताच मार्ग निघाला नव्हता. दहा दिवस उलटून गेले तरीही परिस्थिती 'जैसे थे' राहिली. याचा नाहक त्रास मात्र ग्रामस्थांना सोसावा लागत आहे.
ग्रामसेवक कृष्णात माने हे बेकायदेशीर व नियमबाह्य कामांना विरोध करत असल्यामुळेच सरपंचाने त्यांच्या बदलीची मागणी केली आहे. मात्र आपले कर्तव्य चोख बजावत असलेल्या व पारदर्शी काम करणाऱ्या ग्रामसेवक माने यांची कार्यपद्धती आम्हाला मान्य आहे. सध्याच्या परिस्थितीत त्यांची अन्यत्र कुठेही बदली करू नये. याउलट ग्रामसेवकासह ग्रामस्थांना वेठीस धरणाऱ्या सरपंचावर शिस्तभंगाची कारवाई करण्यात यावी. अन्यथा ग्रामपंचायतीच्या दारातच तीव्र आंदोलन करू, असा इशारा ग्रामस्थांनी निवेदनाच्या माध्यमातून दिला आहे.