कोल्हापूर : हातकणंगले लोकसभा मतदारसंघात शिंदेसेनेचे उमेदवार धैर्यशील माने यांना पुन्हा खासदार बनवण्यात मोलाचा वाटा उचललेले आमदार विनय कोरे, आमदार प्रकाश आवाडे आणि आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांना मंत्रिपद मिळण्याच्या चर्चा पुन्हा सुरू झाल्या आहेत. मंत्रिमंडळाच्या १५ जागा रिक्त असून २७ जूनला सुरू होणाऱ्या पावसाळी अधिवेशनाच्या आधी मंत्रिमंडळ विस्तार करण्यात येणार आहे. त्यामध्ये यातील किमान एकाची वर्णी लागण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.सध्या महायुतीच्या मंत्रिमंडळात कोल्हापूर जिल्ह्यातील हसन मुश्रीफ हे एकमेव मंत्री म्हणून कार्यरत आहेत, तर राजेश क्षीरसागर हे राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष असून या पदाचा मंत्रिपदाचा दर्जा देण्यात आला आहे. लोकसभा निवडणुकीमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कोल्हापूर आणि हातकणंगले लोकसभेसाठी अनुक्रमे संजय मंडलिक आणि धैर्यशील माने यांना उमेदवारी दिली होती. केवळ उमेदवारी न देता शिंदे यांनी या दोघांसाठी रात्रीचा दिवस केला होता.
परंतु संजय मंडलिक हे दीड लाखाच्या फरकाने पराभूत झाले आणि धैर्यशील माने हे १४ हजारांवर मतांनी निवडून आले. एकूणच महाराष्ट्रात महायुतीला जोराचा झटका बसल्याने आता विधानसभेसाठीच्या जोडण्यांचा प्रमुख भाग म्हणून नव्याने काही जणांचा मंत्रिमंडळात समावेश करण्यात येणार असल्याचे सांगण्यात येते. शिंदेसेनेचे आमदार प्रकाश आबिटकर हे दोनदा विधानसभेवर निवडून आले असले तरी त्यांच्या मतदारसंघात मंडलिक हे तब्बल ६५ हजारांवर मतांनी पिछाडीवर राहिल्याने मंत्रिपदावरील त्यांचा दावा हलका झाल्याचे मानले जाते.याउलट धैर्यशील माने यांना इचलकरंजीतून ३९ हजारांवर, तर शिरोळ मतदारसंघातून तीन हजारांवर मताधिक्य मिळाले आहे. सत्यजित पाटील सरूडकर हे शाहूवाडी या त्यांच्या तालुक्यातून मोठे मताधिक्य घेतील, असे चित्र होते; परंतु कोरे यांनी शाहूवाडीतून मिळू शकणाऱ्या सरूडकरांच्या मताधिक्याला प्रामाणिक काम करत कात्री लावल्याने या तिघांच्याही नावांची आता मंत्रिपदासाठी चर्चा सुरू झाली आहे.
भाजप कोणाला देणार प्राधान्यशिंदेसेनेकडून राजेंद्र पाटील यड्रावकर हे मंत्रिपदाच्या शर्यतीत आहेत; परंतु भाजपचा एकही आमदार नसल्याने मंत्रिपद द्यायचेच झाल्यास सहयोगी पक्षाचे विनय कोरे किंवा प्रकाश आवाडे यांना संधी दिली जाणार का, हा प्रश्न उपस्थित केला जात आहे. आवाडे यांना मंत्रिपद देण्यापेक्षा त्यांना भाजपमध्ये प्रवेश देऊन त्यांचे समाधान केले जाऊ शकते. कोरे मात्र मंत्रिपद मिळणार असले तरी तीन महिन्यांसाठी ते हे पद स्वीकारतील का याबाबतही शंका व्यक्त होत आहे.