कोल्हापूर : कोरोना संसर्गाच्या काळात मास्कचा वापर न करणाऱ्या तसेच शारीरिक अंतर न ठेवणाऱ्या १६७ व्यक्तींवर महापालिका व पोलीस प्रशासनाने कारवाई करून त्यांच्याकडून एकूण २६ हजार ६०० रुपयांचा दंड वसूल केला. गेल्या काही दिवसांपासून शहरात ही कारवाई सुरू आहे.
कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी मास्कचा वापर, शारीरिक अंतर ठेवणे यांस सक्ती करण्यात आली आहे. सार्वजनिक ठिकाणी थुंकण्यालाही प्रतिबंध करण्यात आला आहे, तरीही शहरात काही नागरिक नियम पाळत नाहीत. सोमवारी शहराच्या विविध भागात नियमांचा भंग केल्याबद्दल महानगरपालिका, केएमटी आणि पोलीस प्रशासनाच्या पथकाकडून विनामास्क १४८ व्यक्तींकडून १४ हजार ८००, शारीरिक अंतर न राखणाऱ्या नऊ व्यक्तींकडून पाच हजार रुपये तर सार्वजनिक ठिकाणी थुंकल्याबद्दल नऊ व्यक्तींकडून १८०० रुपयांचा दंड वसूल केला.