कोल्हापूर : कोरोना संसर्गापासून स्वत:चा बचाव करावा म्हणून मास्क लावण्याची सक्ती करण्यात आली आहे, तरीही नागरिक मास्क लावत नाहीत. मंगळवारी महापालिकेच्या पथकामार्फत अशा मास्क न लावणाऱ्या, तसेच नियमांची अंमलबजावणी न करणाऱ्या ९१ व्यक्तींवर कारवाई करून १२ हजार ५०० रुपयांचा दंड वसूल केला.
कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी मास्कचा वापर करावा, सामाजिक अंतर ठेवावे, हॅण्डग्लोज वापरावेत, सार्वजनिक ठिकाणी थंकू नये, अशा सूचना महापालिका प्रशासनाने दिल्या आहेत. या गोष्टींचे पालन करणे गरजेचे आहे. मात्र, तरीही शहरातील नागरिक बेफिकीर वागत असल्याचे दिसून येते. कोरोना संसर्ग रोखण्यासाठी प्रतिबंधक गोष्टींचा भंग केल्याबद्दल महानगरपालिका, केएमटी कर्मचारी आणि पोलीस प्रशासनाच्या पथकाकडून विनामास्क ७८ लोकांकडून ७८००, सोशल डिस्टन्स सात लोकांकडून ३५०० व सार्वजनिक ठिकाणी थुंकल्याबाबत सहा लोकांकडून १२००, असे एकूण ९१ लोकांकडून १२ हजार ५०० रुपयांचा दंड वसूल केला आहे.
दंड वसूल करणे हा महापालिका प्रशासनाचा उद्देश नसून कोरोना प्रतिबंधक उपाययोजनांचे काटेकोर पालन करून नागरिकांनी कोरोना संसर्ग रोखण्यासाठी महापालिकेला सहकार्य करावे, असे आवाहन प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांनी केले आहे.
शहरामध्ये गर्दी वाढत असल्याने नागरिकांनी दक्षता घ्यावी. सण, समारंभ, धार्मिक स्थळे, भाजी मार्केट याठिकाणी काही निर्बंध घातले असून, नागरिकांनी पालन करावे, असे आवाहन बलकवडे यांनी केले आहे.