कोल्हापूर : कोविड संसर्गापासून बचाव करण्याकरिता महानगरपालिका प्रशासनाने केलेल्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या शहरातील ५८ व्यक्तींवर बुधवारी दिवसभरात दंडात्मक कारवाई करुन त्यांच्याकडून ३४ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.
कोविड संसर्ग रोखण्यासाठी महानगरपालिका, केएमटी आणि पोलीस कर्मचाऱ्यांची संयुक्त पथके कोल्हापूर शहरात काम करत आहेत. महापालिकेने केलेल्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्तींना पकडून त्यांच्यावर दंडात्मक कारवाई केली जात आहे. वारंवार सांगून सुद्धा नागरिक बाजारपेठेत, रस्त्यावर विनामास्क फिरत असतात. त्यामुळे थेट जागेवर विना मास्क कोणी आढळला की त्याला पाचशे रुपये दंड केला जात आहे.
दंड वसूल करणे हा महापालिका प्रशासनाचा उद्देश नसून कोरोना प्रतिबंधक उपाययोजनांचे काटेकोर पालन करुन नागरिकांनी कोरोना संसर्ग रोखण्यासाठी महापालिकेस सहकार्य करावे, असे आवाहन प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांनी केले आहे.