लोकमत न्यूज नेटवर्क
पेठवडगाव : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने जाहीर केलेल्या लाॅकडाऊनला संमिश्र प्रतिसाद मिळत आहे. याकाळात विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्या ४० मोटारसायकलस्वारांवर, तसेच विनामास्क फिरणाऱ्यांवर कारवाई करण्यात आली.
दरम्यान, तहसीलदार प्रदीप उबाळे यांनी अत्यावश्यक सेवेतील आस्थापनेची पाहणी केली. बिरदेव चौकातील लकी शेती भांडार येथे कोविड चाचणी प्रमाणपत्र नसल्याबद्दल पाचशे रुपये दंड ठोठावण्यात आला. तसेच प्रतिबंधित क्षेत्राची पाहणी करून होम क्वारंटाईन, होम आयसोलेशन रुग्णांनी फिरू नये, अन्यथा कठोर कारवाई करण्याच्या सूचना तहसीलदार उबाळे यांनी दिली.
जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार संचार बंदीची कडेकोट अंमलबजावणी करण्याचा निर्णय पोलीस व पालिका प्रशासनाने घेतला. शनिवारी सकाळी विजयसिंह यादव चौकात, तर सायंकाळी वठार नाका चौकात पोलीस निरीक्षक संतोष घोळवे, सहायक पोलीस निरीक्षक स्वाती सूर्यवंशी यांच्या नेतृत्वाखालील पोलीस व पालिका कर्मचारी यांनी धडक कारवाई केली. कारवाई करताना वाहनधारकांचे तापमान, ऑक्सिजन पातळीची तपासणी करण्यात आली.
यावेळी पोलीस नाईक विशाल हुबाले, बाबासाहेब दुकाने, रजनीकांत वाघमारे, पालिकेचे स्वप्निल रानगे, प्रकाश पाटील, सुरेश भोपळे, आदी उपस्थित होते.
फोटो ओळ पेठवडगाव : येथील विजयसिंह यादव चौकात संचारबंदीचा भंग करणाऱ्या मोटारसायकलस्वारांवर कारवाई करण्यात आली. यावेळी पोलीस निरीक्षक संतोष घोळवे यांच्यासह पालिका, पोलीस कर्मचारी, आरोग्य सेविका. (छाया : संतोष माळवदे)