कोल्हापूर : कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर देशभरात ‘लॉकडाऊन’चा आदेश लागू आहे. तरीही त्याचे उल्लंघन करून काही आमदारांसह प्रतिष्ठित व्यक्ती व संस्थांनी जिल्ह्याबाहेरील लोकांना कोल्हापुरात प्रवेशाची पत्रे दिली आहेत. यामुळे आरोग्य व्यवस्थेवरील ताण वाढला असून, कायदा सुव्यवस्थेचाही प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे ही पत्रे जप्त करून संबंधित आमदारांसह इतरांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश पोलीस अधीक्षकांना दिले आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी येथे दिली.जिल्हाधिकारी देसाई म्हणाले, संपूर्ण देशभरासह जिल्ह्यातही संचारबंदी लागू आहे. परंतु गेल्या तीन चार दिवसांत काही आमदार, प्रतिष्ठित व्यक्ती व संस्था शिफारसपत्रे घेऊन जिल्ह्याबाहेरील लोक कोल्हापूरच्या हद्दीपर्यंत येत आहेत. प्रत्येक तपासणी नाक्यावर ही पत्रे दाखवून त्यांनी चार जिल्ह्यांच्या सीमा पार केल्या आहेत.
कोल्हापुरात येऊन त्यांनी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण केला आहे. यासाठी पत्र देणारे आमदार व इतर व्यक्ती, संस्था जबाबदार आहेत. जिल्ह्याबाहेरील लोक या ठिकाणी आल्यानंतर कोरोना विषाणूचा संसर्ग होण्याची भीती असून यामुळे संपूर्ण आरोग्य यंत्रणा कोलमडणार आहे. परिणामी, प्रशासनावर याचा ताण येणार आहे. त्यामुळे ही पत्रे जप्त करून संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश पोलीस अधीक्षकांना दिले आहेत.