कोल्हापूर : लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार शाहू छत्रपती यांना समर्थन देण्यासाठी विनापरवानगी मेळावा घेऊन आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन केल्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील यांच्यासह ४० जणांवर करवीर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. पुईखडी येथील एका मंगल कार्यालयात रविवारी (दि १४) दुपारी मेळावा झाला होता. याबाबत करवीर पोलिस ठाण्यातील हवालदार अविनाश भिकाजी पोवार यांनी फिर्याद दिली.लोकसभा निवडणुकीसाठी आचारसंहिता सुरू असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील यांच्या गटाचा पुईखडी येथील मंगल कार्यालयात मेळावा झाला. तसेच शहरातून वाहनांच्या रॅलीने कार्यकर्ते न्यू पॅलेस येथे गेले. याबाबत पोलिस आणि निवडणूक निर्णय अधिका-यांची कोणतीही परवानगी घेतली नाही. जिल्हाधिका-यांच्या आदेशाचे उल्लंघन केल्याबद्दल ए. वाय. पाटील यांच्यासह अविनाश आनंदराव पाटील, राजाराम यशवंत पाटील, शिवानंद महाजन (चौघे रा. सोळांकूर, ता. राधानगरी), दिनकर बाळा पाटील (रा. आणाजे), राजाराम काकडे (रा. आवळी), नेताजी पाटील (रा. मांगोली), शिवाजी पाटील (रा. तारळे), दीपक पाटील (रा. कांबळवाडी) यांच्यासह ३० ते ४० जणांवर गुन्हा दाखल झाला. आचारसंहिता उल्लंघनाचा जिल्ह्यात हा पहिलाच गुन्हा दाखल झाल्याची माहिती पोलिसांनी दिली.
आचारसंहितेचे उल्लंघन; कोल्हापुरात ए. वाय. पाटील यांच्यासह ४० जणांवर गुन्हा
By उद्धव गोडसे | Published: April 16, 2024 12:37 PM