इस्लामपूर : कोल्हाटी-डोंबारी समाजातील जात पंचायतीची बंधने आणि विवाह पद्धतीच्या जाचक रुढी-परंपरा धुडकावून लावत या समाजातील महिलांच्या लक्षणीय उपस्थितीत एक विवाह थाटात पार पडला. सामाजिक मूल्यांच्या अभिसरणाची साक्ष देणारा हा विवाह सोहळा शुक्रवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास येथील मार्केट यार्डातील समाजाच्या वसाहतीमध्ये झाला. सचिन अनिल जावळे (इस्लामपूर) व काजल मारुती मोरे (आष्टा) या दोघांनी हे क्रांतिकारी पाऊल उचलत विवाहाची सप्तपदी चालली. या लग्नसमारंभास समाजाचे पाटील, पंच, गुरव यांची अनुपस्थिती होती. कोल्हाटी-डोंबारी समाजाच्यादृष्टीने इस्लामपूर व आष्टा ही दोन्ही शहरे संवेदनशील बनली होती. या जात पंचायतीविरुद्ध अनेक गुन्हे दाखल झाले. त्यानंतर तत्कालीन पोलीस उपअधीक्षक व सध्याचे अप्पर पोलीस अधीक्षक लक्ष्मीकांत पाटील यांनी राजकीय, सामाजिक आणि चळवळीतील नेते, कार्यकर्त्यांना सोबत घेत कोल्हाटी-डोंबारी समाजातील पाटील, पंच, गुरव यांचे प्रबोधन करून, ही जात पंचायतीची अनिष्ट प्रथा कायमची बंद करण्याचे लेखी लिहून घेतले होते. त्यावेळी माजी आमदार विलासराव शिंदे, विजयभाऊ पाटील, शहाजी पाटील, संजय बनसोडे, प्रा. सतीश चौगुले यांच्या उपस्थितीत समाजाचे पाटील दिलीप जावळे व त्यांच्या सहकाऱ्यांनी जात पंचायतीला मूठमाती देण्याचा निर्णय जाहीर केला.दरम्यान, दोन दिवसांपूर्वी सचिन जावळे व काजल मोरे यांनी एकमेकांशी विवाहबद्ध होताना, लग्नपद्धतीची सर्व बंधने झुगारून दिली. कोल्हाटी-डोंबारी समाजात लग्नावेळी देवाच्या दारात मुला-मुलीचे दोन स्वतंत्र मांडव घालावे लागतात. तेथे एकमेकांच्या देवाला भेटण्याचा कार्यक्रम झाल्यावर मग हळदी व इतर कार्यक्रम होऊन लग्नाचा विधी उरकला जातो. मात्र या सर्व पारंपरिक रितीरिवाजांना फाटा देत सचिन व काजल या सुधारणावादी नवदाम्पत्याने समाजातील महिलांच्या लक्षणीय उपस्थितीत एकमेकांना वरमाला घालून, आयुष्यभर सोबत राहण्याचा संकल्प केला. यावेळी इस्लामपूर, इचलकरंजी, कऱ्हाड, सातारा, आष्टा येथील समाजबांधव उपस्थित होते. (वार्ताहर)परंपरेला छेदकोल्हाटी, डोंबारी समाजात विवाहावेळी देवाच्या दारात वधू व वर अशा दोघांचे स्वतंत्र मंडप घातले जातात. तेथे एकमेकांच्या देवाला भेटण्याचा कार्यक्रम होतो. मग हळद व इतर धार्मिक कार्यक्रम होऊन लग्नाचा विधी पार पाडला जातो. पण या परंपरेला सचिन व काजल या दोघांनी छेद दिला आहे.
जात पंचायतीची बंधने झुगारून विवाह
By admin | Published: October 11, 2015 11:13 PM