कोल्हापूर : पुणे जिल्ह्यातील भीमा कोरेगाव येथे शौर्य दिनानिमित्त काढलेल्या मिरवणुकीदरम्यान झालेल्या दगडफेकीच्या घटनेचा निषेध करण्यासाठी पुकारण्यात आलेल्या महाराष्ट्र बंदला कोल्हापूरात उत्स्फुर्तपणे प्रतिसाद मिळत आहे.कोल्हापूरात कडकडीत बंद पाळण्यात येत असून ठिकठिकाणी कार्यकर्त्यांकडून रास्ता रोको करण्यात येत आहे. आंबेडकरवादी कार्यकर्ते आक्रमक झाले असून त्यांच्याकडून वाहनांची तोडफोड सुरु आहे. सार्वजनिक वाहतूक व्यवस्था बंद करण्यात आली असून स्कूलबस आणि स्कूल व्हॅन बंद ठेवण्यात आल्याने बहुतांशी शाळांना अघोषित सुटी मिळाली आहे.कोल्हापूर जिल्ह्यात महाराष्ट्र बंदला बुधवारी उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला. कोल्हापूरात आर. के. नगर नाक्यावर जमावाकडून तोडफोड करण्यात आली तसेच बंदोबस्तावर असलेल्या पोलिसाला मारहाण करण्यात आल्याने या बंदला हिंसक वळण लागण्याची चिन्हे आहेत. आंबेडकरवादी कार्यकर्ते पायी आणि दुचाकीवरुन कोल्हापूर बंदचे आवाहन करत शहरातून निषेध मोर्चा काढत आहेत.
कोल्हापूरात ठिकठिकाणी बंदचे आवाहन करणाऱ्या कार्यकर्त्यांकडून तोडफोडीचे आणि दगडफेकीचे प्रकार होत असल्याने कडक पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. राज्य राखीव दलाचे पोलिसही तैनात करण्यात आले आहेत. आंबेडकरवादी कार्यकर्ते आक्रमक झाले असून रस्त्यावर पार्किंगमधील चारचाकी आणि दुचाकी गाड्या फोडण्यात येत आहेत. ठिकठिकाणी बंदोबस्ताला असणाऱ्या पोलिसांचीही यातून सुटका झालेली नाही. पोलिसांना घेराव घालण्यात येत असून त्यांना मारहाण करण्यात येत आहे.
आरकेनगर, संभाजीनगर, शिवाजी पूलावर रास्ता रोको करण्यात आल्याने वाहतूक व्यवस्था ठप्प होत आहे. लक्ष्मीपुरी येथील भाजी मंडई बंद करण्यास भाग पाडण्यात आली असून कावळा नाका परिसरात कडकडीत बंद पुकारण्यात आला आहे. कोल्हापूर शहरात काही युवकांनी सदर बाजार परिसरात रस्त्यावर येत रास्ता रोको केला. यावेळी युवकांनी जोरदार घोषणाबाजी केली. येथे काही काळ तणावाचे वातावरण होते.जैन मंदिराजवळ एक बस फोडण्यात आली असून गुजरीमध्येही काही सराफी दुकानांवर दगडफेक झाल्याने सर्व दुकाने बंद करण्यात आली असून महाद्वार रोडवर तणाव आहे. करवीरनिवासिनी अंबाबाई सुवर्णपालखी कार्यालयावरही जमावाने दगडफेक केली असून शिवाजी चौकात मोठ्या संख्येने जमाव एकत्र झाला आहे. या परिसरात मोठा तणाव आहे.शहरातील शाळांना अघोषित सुटी जाहीर झाली आहे. कोल्हापूर शहर बस वाहतूक सकाळी सुरु होती, परंतु जमावाने दगडफेक करुन एक बस फोडल्यानंतर शहरातील सर्व बस वाहतूक कोल्हापूर महानगरपालिका प्रशासनाने बंद केली. दसरा चौक आणि उद्यमनगर येथील आगारात या सर्व बसेस थांबविण्यात आल्या. स्कूल बसेस आणि स्कूल व्हॅन, विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या रिक्षा बंद झाल्याने पालकांनी आपल्या मुलांना शाळेत पाठविलेले नाही. इंग्रजी माध्यमांच्या सर्व शाळा बंद ठेवण्यात आल्या असून मराठी माध्यमांच्या बहुतांश शाळांमध्ये अघोषित बंद आहे.
मुरगूडमध्येही मोठा निषेध मोर्चा कार्यकर्त्यांनी काढला असून मुरगूडमध्ये संपूर्णपणे बंद आहे. सांगली- कोल्हापूर मार्गावरील रुकडी फाट्यावर कार्यकर्त्यांनी रस्ता बंद करण्याचा प्रयत्न केला आहे, परंतु अद्याप वाहतूक सुरु आहे. इचलकरंजी येथे माकप कार्यकर्त्यांनी निदर्शने केली असून इचलकरंजीत कडकडीत बंद पाळण्यात आला आहे. कबनूर, बिद्री, गारगोटी, राधानगरी रोड, हळदी, इस्पूर्ली, म्हासुर्ली, गोकुळ शिरगाव, माणगाव फाटा येथे रास्ता रोको करण्यात आला असून वाहतूक ठप्प झाली आहे.