लोकमत न्यूज नेटवर्क, कोल्हापूर : हिंदुत्ववादी संघटनांनी पुकारलेल्या ‘कोल्हापूर बंद’ला दगडफेक, वाहनांची तोडफोड, बाटल्या-विटांचा वर्षावामुळे गालबोट लागले. सुरुवातीला संयमी भूमिका घेणाऱ्या पोलिसांनी नंतर मात्र आक्रमक भूमिका घेत लाठीमार, तीन ठिकाणी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडून जमावाला पांगविले. दगडफेकीत चार पोलिसांसह १५ जण जखमी झाले. दगडफेकप्रकरणी पोलिसांनी सुमारे ५० तरुणांना ताब्यात घेतले आहे.
सध्या परिस्थिती नियंत्रणात असून, शहरात शांतता आहे. औरंगजेबाचे उदात्तीकरण करणारे स्टेट्स मुस्लिम समाजातील दोन युवकांनी लावल्याच्या निषेधार्थ हिंदुत्ववादी संघटनांनी शहर बंदची हाक देत छत्रपती शिवाजी चौकात जमण्याचे आवाहन केले होते. कोल्हापूर शहरात खबरदारीचा उपाय म्हणून इंटरनेट सेवा बुधवारी सायंकाळी ५ वाजल्यापासून ते गुरुवारी (८ जून ) मध्यरात्री १२ वाजेपर्यंत ३१ तासांच्या कालावधीकरिता खंडित करण्याचे आदेश गृहविभागाच्या प्रधान सचिवांनी दिले आहेत.
शहरात शिवाजी चौक, माळकर तिकटी, पापाची तिकटी, अकबर मोहल्ला, मेढे तालीम, सोमवार पेठ, काळाईमाम, बाराईमाम, बिंदू चौक, बागवान गल्ली येथे तोडफोड झाली.
स्थिती पूर्णपणे नियंत्रणात आहे. कायदा कोणीही हाती घेऊ नये. अचानक औरंगजेबाचे समर्थक कुठून आले? याच्या मागे कोण आहे? जाणूनबुजून कायदा-सुव्यवस्था कोणी बिघडवत आहे का? याचा शोध घेतला जाईल. - देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री.
एखाद्या मेसेजवरून त्याला धार्मिक स्वरूप दिले जाते, कोल्हापूर बंद पाळला जातो, आणि सरकार त्याला प्रोत्साहन देते, ही गंभीर बाब आहे. कायदा आणि सुव्यवस्था पाळणे हे सरकारचे काम आहे. - शरद पवार, अध्यक्ष, राष्ट्रवादी