कोल्हापूर : शारदीय नवरात्रौत्सवात पंचमीला कोल्हापुरातील अंबाबाईची पारंपारिक गजारुढ पूजा बांधण्यात आली. आपल्यावर रागावलेल्या मैत्रिणीचा रुसवा काढण्यासाठी अंबाबाई लव्याजम्यानिशी तिच्याकडे जाते असा या पुजेचा अन्वयार्थ आहे. देवांनी अंबाबाईच्या साह्याने कामाक्ष राक्षसाचा पराभव केल्यानंतर त्याने कपिल मुनींचा योगदंड मिळवला व योगदंड फिरवून त्याने सर्व देवांचे शेळ्या मेंढ्यात रुपांतर केले व देवांचा पराभव झाला. तेंव्हा त्र्यंबोली देवीने मोठ्या चतुराईने हा योगदंड कामाक्षाकडून काढून घेतला व त्याचा वध करून देवांना पूर्ववत केले. पुढे अंबाबाईने कोल्हासुराचा वध केला. पण अंबाबाईच्या विजयोत्सवात त्र्यंबोली देवीला बोलवायचे राहून गेले. तेंव्हा ती रुसुन पुर्वेकडील टेकडीवर जाऊन बसली. ही चूक लक्षात आल्यानंतर अंबाबाई स्वत: प्रिय मैत्रिणीचा रुसवा काढण्यासाठी त्र्यंबोली टेकडीवर जाते.या घटनेला अनुसरुन पंचमीला ही पूजा बांधली जाते. आनंद मुनीश्वर, किरण मुनीश्वर, मयूर मुनीश्वर, श्रीनिवास जोशी, सचीन गोटखिंडीकर यांनी ही पूजा बांधली.
Navratri 2023: पंचमीला कोल्हापूरच्या अंबाबाईची गजारुढ पूजा
By इंदुमती सूर्यवंशी | Published: October 19, 2023 5:14 PM