इंदुमती गणेश कोल्हापूर : माझे आजोबा वसंतराव माईणकर हे व्हायोलिन, सतार, दिलरुबा, हार्मोनियम, तबला या वाद्यांचे वर्ग घ्यायचे. वडिलांना व्हायोलीन आवडायचे. मी वादनाची सुरुवात तबल्यापासून केली; पण महाविद्यालयात गेलो आणि व्हायोलिनशी तारा जुळल्या. माझ्या वादनाला शास्त्रीय संगीत आणि अभ्यासक्रमाचा पाया दिला तो गुरू सदाशिव नवांगुळे यांनी. त्यांच्यामुळे मी संगीत विशारद झालो..व्हायोलीन वादक म्हणून करिअर घडण्यात या तीनही गुरुंचे मला मोलाचे मार्गदर्शन लाभले. शिक्षक दिनानिमित्त कोल्हापुरातील एकमेव व्हायोलीन वादक केदार गुळवणी यांनी गुरुंबद्दलच्या भावना व्यक्त केल्या.माझे शालेय शिक्षण स. म. लोहिया हायस्कूलमध्ये, तर महाविद्यालयीन शिक्षण डी. डी. शिंदे सरकार महाविद्यालयात झाले. लहानपणापासून कानावर वाद्यांचे सूर पडत असल्याने त्यांच्याशी नाते जुळले होते; पण अकरावीत असताना व्हायोलीनची गोडी लागली. महाविद्यालयात पहिल्यांदा व्हायोलीन वाजविल्यानंतर जे प्रोत्साहन मिळाले, ते आजही लक्षात आहे. त्यानंतर रंगमंचीय सादरीकरणाला सुरुवात झाली.
महेश काळे, शौनक अभिषेकी, रवींद्र साठे, चंद्रशेखर गाडगीळ, अनुराधा पौडवाल, उत्तरा केळकर अशा अनेक दिग्गज गायकांना साथसंगत करण्याची संधी मिळाली. शास्त्रीय-उपशास्त्रीय संगीत, नाट्यगीत, नाटक, पार्श्वसंगीत, चित्रपटांचे रेकॉर्डिंग, चित्रपटगीते या सगळ्या प्रकारांत मी व्हायोलीन वाजवू शकलो, ते गुरुंमुळे. आजही त्यांच्या आशीर्वादाने हा प्रवास आणि नवी पिढी घडविण्याचे कार्य सुरू आहे.आधी शास्त्रीय संगीत शिक..मला चित्रपटातील गाणी वाजवायला आवडायचे, तर आजोबा शास्त्रीय संगीताचे उपासक. एकदा मला व्हायोलीनवर गाणं वाजविताना त्यांनी ऐकले आणि रागावून दम भरला. आधी शास्त्रीय संगीत शिक. जोपर्यंत तुझा शास्त्रीय संगीताचा पाया पक्का होणार नाही, तोपर्यंत तू अन्य कोणत्याही प्रकारात वाद्य वाजवू शकणार नाहीस. तेव्हापासून मी त्यांच्यासमोर गाणी वाजवायचे बंद केले; पण शास्त्रीय संगीत यायला लागल्यानंतर मी एकदा राग बागेश्री वेस्टर्न स्टाईलमध्ये वाजवले, यावेळी मात्र कौतुकाची थाप दिली.म्हणून संगीत विशारद झालो...मला कुटुंबातूनच व्हायोलीन वादनाचे धडे मिळाले असले, तरी संगीत विशारद किंवा शास्त्रशुद्ध अॅकॅडमीक पद्धतीने याचे शिक्षण घेण्यास सांगितले, ते सदाशिव नवांगुळे सरांनी. ते माझ्या आजोबांचे शिष्य. गायन समाज देवल क्लबमध्ये शिकवायचे. इतका छान व्हायोलीन वाजवतोस, तर संगीत विशारद हो... हा कानमंत्र त्यांनी मला अमलात आणायलाच लावला. त्यांच्यामुळे मी संगीत विशारद पदवी संपादन केली व माझा संगीताचा पाया अधिक पक्का झाला.